Breaking News

पत्नीचा मृतदेह रुग्णालयातच टाकून पती झाला फरार!

बुलडाणा, दि. 09 - येथील सामान्य रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास विवाहितेचा मृतदेह टाकून पती फरार झाल्याची घटना 4 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस  आली. याप्रकरणी माझ्या मुलीचा सासरच्या मंडळींनी घात केला, असा विलाप करीत मृतक विवाहितेच्या माता-पित्याने पतीसह इतर मंडळीवर गुन्हा दाखल  करण्याची मागणी केली आहे. याबाबत तज्ज्ञांकडून पोस्टमार्टम करून घेण्याचा दबाव वाढल्यानंतर विवाहितेचा मृतदेह अकोला सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात  आला आहे.
जाफ्राबाद पोलीस स्टेशनांतर्गत माहोरा गावचे सासर असलेली विवाहिता जयश्री प्रकाश शिरसाट (वय 22) हिचे माहेर शिरपूर आहे. मागील चार वर्षांपूर्वी तिचा विवाह  झाला. पतिकडून मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याची तक्रार यापूर्वीही तिने आई-वडिलांकडे केली होती. त्यानंतर वकील  आणि इतर मध्यस्थांकडून  समझोता होऊन तिला पुन्हा सासरी पाठविण्यात आले होते. तरीही तिला भेटू न देणे, तिच्याशी बोलू न देणे, तिला मारहाण करणे, असे प्रकार नेहमी होत असल्याचा  आरोप मृतक विवाहितेचे वडील मदन वामन हिवाळे यांनी केला आहे.   दुसरीकडे विवाहितेचा मृत्यू साप चावल्यामुळे झाल्याचे सासरची मंडळी रुग्णालयात नोंद  करताना सांगून गेली. कुणी साप चावल्याचे म्हटले, तर कुणी विंचू चावल्याचे, तर तिच्या पतीने संडास- उलटीमुळे मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. अशा वेगवेगळ्या  विधानांमुळे विवाहितेचा मृत्यू नेमका कशाने झाला हे पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच कळणार आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनटक्के यांनी अकोला जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधून मृतदेह अकोला येथे रवाना केला. शिवसेना नेते संजय गायकवाड, समाजसेवक  अशोक गव्हाणे, उपाध्यक्ष विजय जायभाये यांनीही विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूच्या चौकशीची मागणी केली आहे. घटनास्थळ जाफ्राबाद (जि.जालना) असूनही  एसडीपीओ महामुनी यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.