Breaking News

कचरा संकलन केंद्र हटवण्यासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन

अहमदनगर, दि. 09 - जुने मनपा कार्यालय परिसरात असलेल्या मोटार गॅरेजशेजारील कचरा संकलन केंद्र हटवावे, या मागणीसाठी मंगळवारी सकाळी अहमदनगर  शहर सुधार संघर्ष अभियान व परिसरातील विद्यार्थ्यांच्यावतीने कचरा डेपोसमोर आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व अभियानाचे उबेद शेख, संजय झिंजे, शाकीर शेख, अजय  चितळे,  संतोष लोखंडे,  सचिन वाघ, आतिष गायकवाड, सुरज गावडा, आनंद पुंड  यांनी केले. यावेळी परिसरातील सर्व शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. कचरा केंद्र हटविण्यासंदर्भांत चार महिन्यापूर्वी पत्र दिले. सदर कचरा डेपो अनाधिकृतपणे सुरु  आहे. असे असताना ही आजही कचरा आणून टाकला जातो. या कचर्‍यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांचे व नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरात 4 ते 5  शाळा तसेच मनपा कामगार व अधिकारी यांचे निवासस्थान आहे, तसेच मनपाचे प्रभाग कार्यालय आहे. त्यामुळे या परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ असते. या  परिसरातून जाताना नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होतो. कचर्‍यामुळे घाणीचे साम्राज्य झाले आहे. सदरचे संकलन केंद्र त्वरित हलवावे, अन्यथा केंद्रावरील कचरा  आयुक्तांच्या दालनात टाकला जाईल, या सर्व प्रकारास मनपा प्रशासन जबाबदार राहील, असे प्रत्रकात म्हंटले आहे.