Breaking News

शासकीय मालमत्तेची चोरी करणार्‍यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनच पाठराखण

कार्यकारी अभियंत्याच्या पत्राला उपविभागीय अभियंत्याकडून केराची टोपली

बुलडाणा, दि. 09 - लोणार तालुक्यातील कोयाळी दहातोंडे येथील भगवान मुरलीधर दहातोंडे यांनी वडगाव तेजन ते कोयाळी दहातोंडे रस्ता ग्रामीण मार्ग 70 लांबी  3.80 कि.मी. मधील साक्र 3/365 ते 3/390 मधील 25.90 मीटर लांबीचा उखडून त्यातील गिट्टी व मरुम चोरुन नेला. सदर रस्ता शासनाच्या मालकीचा व  जिल्हा परिषदेच्या निधीतून तयार करुन शेतकर्‍यांना येण्याजाण्यासाठी रहदारीस मोकळा करुन दिला. परंतु दहातोंडे यांनी त्या रस्त्यावरील पूर्ण गिट्टी चोरुन नेवून  शासनाच्या मालमत्तेचे नुकसान केले आहे.
सदर प्रकरणी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख समाधान चिंचोले यांनी कार्यकारी अभियंता व मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.बुलडाणा  यांच्याकडे तक्रार केली. त्यावरुन कार्यकारी अभियंता जि.प.बुलडाणा यांनी पत्र क्र.468 दि.12 मे रोजी सहाय्यक कार्यकारी अभियंता जि.प.बुलडाणा उपविभाग मेहकर  यांना लेखी पत्र पाठवून चौकशी अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले. सदर चौकशी पत्रावरुन सहा.कार्यकारी अभियंता जि.प.बुलडाणा उपविभाग मेहकर यांनी  जिल्हा कार्यालयाला अहवाल पाठवून सदर रस्ता भगवान मुरलीधर दहातोंडे यांनी शासनाचा रस्ता नागरुन शासकीय मालमत्तेचे रुपये 30,633/- चे शासकीय  मालमत्तेचे नुकसान झाल्याचे कळविले व नियमानुसार उचित कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले. चौकशी अहवालानुसार कार्यकारी  अभियंता जि.प. बांधकाम यांनी दि.13 जुलै रोजी जा. क्र. 1436 नुसार संबंधितांवर शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले असल्यास संबंधितांवर तात्काळ फौजदारी  गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही प्रस्तावित करावी व या कामास प्रथम प्राधान्य देवून स्वत: जातीने लक्ष घालून तक्रार निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. मात्र,  उपविभागीय प्रभारी अभियंता आर.आर.मोरे यांनी जिल्हा कार्यकारी अभियंत्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली असून शासकीय मालमत्तेचे नुकसान करणार्‍या  भगवान दहातोंडे यांना पाठीशी घालत आहेत. सदर प्रकरणात राजकीय दबाव वाढल्याने अभियंता मोरे संबंधितांना पाठीशी घालत असल्याची चर्चा सर्वसामान्य जनतेत  आहे.