Breaking News

शहराच्या विविध ठिकाणांहून दुचाकी चोरणारी तिघांची टोळी गजाआड

वाडिया पार्क, जिल्हा परिषदेच्या पार्किंग मधून चोरीस गेलेल्या 13 दुचाकी हस्तगत  

अहमदनगर, दि. 09 - जिल्हा परिषद, वाडिया पार्क व मार्केट यार्ड येथे पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकी वाहनेे चोरून तिची ग्रामीण भागात कमी किमतीत विक्री  करण्यार्‍या टोळीतील तिघांना कोतवाली पोलिस पथकाने सोमवारी रात्री गजाआड केले. त्यांच्याकडून 13 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. तिघांना मंगळवारी  येथील न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 
सुधीर कडुबाल सरकाळ (शहर टाकली, ता. शेवगाव), हरिभाऊ बारकू पळसकर (देडगाव) व संतोष साहेबराव फुलारी (देडगाव) अशी आरोपीची नावे आहेत.  कोतवाली पोलिस ठाण्यातील डीबीचे कर्मचारी सुमित गवळी यांना खबर्‍यामार्फत मिळलेल्या माहितीवरून पोलीस निरीक्षक परमार यांच्या मार्गदर्शनाखाली केडगाव  परिसरात दीपक गाडीलकर, लकडे इनामदार, भागवत, धामणे, बर्डे, रवी  टाकले,  दुधाळ, घुगासे, राजेंद्र मुळे, आण्णा बर्डे यांनी कारवाई केली. गेल्या अनेक  दिवसापासून शहरातील रुग्णालये, गजबजलेला परिसर, व जिल्हा परिषदेच्या तसेच वाडिया पार्क येथील पार्किंगच्या जागेत लावलेली मोपेड, दुचाकी व सायकल  चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. पोलीस ठाण्यात अनेक दुचाकी चोरीच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या या घटनांचे काही दुकानासमोरील सीसी टीव्ही मध्ये  आरोपी कैद झाले होते. फुटेजनंतर आरोपीचा शोध घेण्यात आला. मात्र आरोपी सापडत नव्हते. सोमवारी सुधीर सरकाले हा दुचाकी चोरण्यासाठी केडगावात येणार  असल्याची माहितीची पक्की खबर होती, त्यानुसार सापळा लावला यात एक आरोपी अडकला त्याला पोलिसी खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला.  त्याने दिलेल्या माहितीवरून इतर दोघांना देडगाव येथून ताब्यात घेतले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून नेवासा परिसरातून 6 दुचाकी तर येथील सिव्हिलच्या पार्किंग  मध्ये उभ्या केलेल्या 6 व दोन दुचाकी दुरुस्तीच्या दुकानातून जप्त करण्यात आल्या. देडगाव येथील आरोपींनी आपल्या नातेवाईकांना सदर दुचाकी पैसे थकल्याने  उचलून आणल्या असे सांगून त्यांच्या दारासमोर लावल्या होत्या. त्याही ताब्यात घेण्यात आल्या. इतर पोलीस ठाण्याचा हद्दीतील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस  येण्याची शक्यता तपासी अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. तपासात सापडलेल्या दुचाकी पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आल्या आहेत. यापैकी दोन  तक्रारदारांनी चोरीस गेलेल्या मोपेड ओळखल्या आहेत दुचाकी चोरीस गेलेल्यांनी खात्रीसाठी आवारातील दुचाकी पाहून तपासी अधिकारी यांच्याकडे इंजिन नंबर, चेसी  नंबर पाहून खात्री करावी, असे आवाहन पो. नि. परमार यांनी केले आहे.