Breaking News

संगमनेरात चार वेगवेगळ्या अपघातात पाच ठार, दोन जखमी

अहमदनगर, दि. 31, ऑगस्ट - संगमनेर शहर व तालुक्यात तीन वेगवेगळ्या अपघातात काल मंगळवारी 5 जण ठार तर एक मुलगा जखमी झाल्याची घटना घडली.  मयतामध्ये एका पादचारी महिलेचा समावेश आहे. 
या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील घरगाव येथील बस स्थानका समोर मंदाबाई अरूण कोकाटे (वय 40) रा. कोठे, ता. संगमनेर हि  महिला लहान मुलाला (नाव माहिती नाही) घेवून रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाणे जाणारा टँकर क्र. एम.एच.14 बी.जे.9293 याने त्यांना जोराची धडक  दिली. जखमी महिला व बालकाला उपचारासाठी दाखल केले असता मंदाबाई कोकाटे हिचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. हि घटना काल दुपारी 2.15 वाजता  नाशिक-पुणे महामार्गावरील घारगांव शिवारात घडली.
दुसरी घटना कोल्हार-घोटी महामार्गावरील गणपती मंदिराजवळील वसंत लॉन्स समोर एका अज्ञात पिकअप वाहनाने मोटार सायकल क्र. यास समोरून जोराची  धडक दिली. झालेल्या अपघातात दुचाकीवरील फकीर हुसेन पठाण (वय 35), नन्नु कोंडीभाई शेख (वय 30) दोघे रा. साकुर, ता. संगमनेर हे दोघे जागीच ठार  झाले. अपघात होताच अज्ञात पिकअप चालक वाहन घेवून फरार झाला. हि काल दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली.
तिसरी घटना तालुक्यातील हिवरगाव पावसा शिवारातील टोलनाका येथे घडली. भरधाव वेगाणे जाणार्‍या आयशर टॅम्पो क्र.एम.एच.14, 367 याने समोरून येणार्‍या  विनानंबर नविन यमहा दुचाकीस जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालक तेजस संजय भोर (वय 17) हा जागीच ठार झाला. तर चेतन भाऊसाहेब राहाणे  दोघे रा. गोल्डन सिटी, अकोले बायपास हा गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  हि घटना काल दुपारी 4.15 वाजेच्या सुमारास घडली.
तर चौथी घटना मंगळवार दि. 22 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता नाशिक-पुणे महामार्गावरील प्रवरा पुलाजवळ घडली. मेघराम मारूती सातपुते (वय 67) रा.  सुकेवाडी हे मोटार सायकल क्र. एम.एच.17, एम. 8429 वरून सुकेवाडीकडे जात असताना त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने ते रस्त्यावर पडले. यात ते गंभीर  जखमी झाले. त्यांचा खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यु झाला. या घटनेचा तपास घारगांव, शहर व तालुका पोलिस करत आहे.