Breaking News

‘मैत्रेय’चा उपक्रम, रक्तदान शिबिरात 95 जणांचे रक्तदान

अहमदनगर, दि. 31, ऑगस्ट - तालुक्यातील आदिवासी भागातील नागरिकांसह अकोले तालुका व शहरातील सर्व समाजातील घटकांना आरोग्याची काळजी  घेण्यासाठी लाभदायक ठरतील असे अनेक प्रकारचे कार्यक्रम अकोले येथील मैत्रेय बहुउद्देशीय प्रतिष्टानच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत. याचाच एक भाग  म्हणून मैत्रेय बहुउद्देशीय प्रतिष्टान अकोले व अर्पण ब्लड बँकेच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी येथील बसस्थानक परिसरातील धुमाळ संकुलात आयोजित केलेल्या  रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात सुमारे शंभरावर तरूणांच्या सहभागामुळे  अर्पण ब्लड बँकेस 95 रक्ताच्या बॅग देण्यात आल्या आहेत. तसेच या गणेशोत्सवात मैत्रेय बहुउद्देशीय प्रतिष्टानच्यावतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून  त्यासाठी  सामाजिक बांधिलकीतून ‘जलयुक्त शिवार’ या शासनाच्या योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शेतकरी व इतरांना दिशादर्शक ठरेल असा जलयुक्त  शिवार योजनेचा देखावा सादर केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी  अकोलेकर गणेशभक्तांची मोठी गर्दी होत आहे.