Breaking News

तीन तीन पाणीयोजना असूनही प्रवरासंगमकरांच्या घशाला कोरड!

विजेचाही झालाय खेळखंखंडोबा   

अहमदनगर, दि. 31, ऑगस्ट - नद्यांच्या संगमामुळे पवित्र झालेल्या प्रवरासंगम परिसराचे धार्मिक कार्यासाठी अनोखी अशा ओळख आणि महत्व आहे. दशक्रिया,  श्राद्ध असे विविध धार्मिक विधी या परिसरात पार पाडले जातात. या भागांत राहणार्‍या लोकांसाठी एक नव्हे तीन तीन पाणी योजना असूनही येथील लोकांच्या  घशाला कोरड आहे. विजेचा खेळखंडोबा झाल्यामुळे ही पाणी योजना सतत बंदच असते. नेवासे तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी लोकांच्या ज्वलंत प्रश्‍नावर शासनाकडे  आक्रमकपणे पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा येथील रहिवाशांमधून व्यक्त केली जात आहे.
प्रवरासंगम व टोका या गावांमध्ये संयुक्त राष्ट्रीय पेयजल, ए. आर. एल. एफ. आणि जुनी पाणीयोजना अशा तीन पाणी योजना आहेत. मात्र तरीही या दोन्ही गावांना  सातत्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या योजनेचा कुठलाही आराखडा दिसून येत नाही. दोन्ही योजनांवर आतापर्यंत अडीच कोटी रुपये खर्च झाले  असून एखाद्या शेतकर्‍याने नदीवरुन पाईपलाईन केल्याप्रमाणे या योजनेचे काम सुरु आहे. या योजनेचा एक जॅकवेल उघड्यावरच आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस  असून वीज केंव्हा गायब होते, हेच कळत नाही.
थोडा जरी पाऊस झाला तरी वीजपंप जळण्याचे प्रकार वारंवार घडतात आणि वारंवार  पाईपलाईन बंद पडते. त्यामुळे येथील लोकांना सतत मनस्ताप सहन करावा  लागत आहे. या भांतील रस्त्याचे तर केव्हांच तीन तेरा वाजले आहेत. ठिकठिकाणी रस्त्यांवरच्या डबक्यांत पाणी साचल्याने डासांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे.  परिणामी येथील लकांच्या आरोग्याचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. साचलेल्या पाण्यामुळे साथीचे आजार बळावण्याची भिती परिसरातील लोकांमधून व्यक्त केली जात  असून या दोन्ही गावांतीललोकांना कोणी वाली अशे की नाही, या समस्या ऐकायला लोकप्रतिनिधींना वेळ मिळेल का, असा सवाल संतप्त रहिवाशांमधून व्यक्त केला  जात आहे.