Breaking News

आरक्षणाच्या धोरणात बदल होणे शक्य नाही - रामविलास पासवान

नवी दिल्ली, दि. 26, ऑगस्ट - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मते काहीही असले तरी मागास जाती व वर्गाला आरक्षण कायमच राहील . आरक्षणाच्या धोरणात मोदी  सरकार कोणताही बदल करणार नाही, असे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी आज येथे सांगितले . अनेक अफवा पसरवल्या गेल्या तरी  आणि रा.स्व. संघाचे वेगळे मत असले तरीही सरकार आरक्षणापासून दूर जाणे शक्य नाही, असेही पासवान म्हणाले.
केंद्रीय मंत्रिमंडळाने इतर मागासवर्गीयांच्या अंतर्गत वर्गीकरणासाठी एक आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या (ओबीसी)  आरक्षणासाठी सधन वर्गासाठीची मर्यादा वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्या नुसार सधन वर्गासाठीची मर्यादा 6 लाख रुपयांवरून 8 लाख रुपये  करण्यात आली.
काही लोक काय म्हणतात याच्याशी सरकारचे काहीही देणे-घेणे नाही. यावर पुनर्विचार होणार नाही. आरक्षणासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी वारंवार सांगितले आहे, असेही पासवान म्हणाले.