Breaking News

अनुसूचित जाती, नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना अनुदानावर ट्रॅक्टर वितरीत

धुळे, दि. 27, ऑगस्ट - अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना अनुज्ञेय असणार्‍या किमान 9 ते 18 अश्‍वशक्तीपेक्षा जादा अश्‍वशक्तीचा  ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदीसाठी 90 टक्के अनुदान योजना लागू करण्यात आली आहे, असे के. जी. बागूल, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, धुळे यांनी  प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
सहाय्यक आयुक्त श्री. बागुल यांनी म्हटले आहे, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना अनुज्ञेय असणार्‍या किमान 9 ते 18  अश्‍वशक्तीपेक्षा जादा अश्‍वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदीसाठी 90 टक्के अनुदान योजना लागू करण्यात आली आहे.
मात्र, त्यांची किंमत कमाल शासकीय अनुदान 3.15 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास अनुदान व्यतिरिक्त जादाची रक्कम संबंधित बचतगटांना भरावी लागेल.  स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. तसेच कमाल 80 टक्के सदस्य, अध्यक्ष व सचिव हे देखील अनुसूचित जाती व नवबौध्द  घटकातील असावेत.
स्वयंसहाय्यता बचत गटाने कृषी विभागाने निर्धारीत केलेल्या प्रमाणकानुसार मान्यता प्राप्त उत्पादकांकडून मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने शासनाने निर्धारीत केलेल्या  किमतीपर्यंत खरेदी करावीत. मिनी ट्रॅक्टर, ट्रॅक्टर खरेदी केल्याची मुद्रांकीत पक्की पावती सादर केल्यानंतर संबंधित बचत गटाच्या बँक खात्यावर 50 टक्के अनुदान  जमा करण्यात येईल.
उर्वरीत 50 टक्के अनुदानाची रक्कम मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने आरटीओ कार्यालयाकडे नोंद झाल्यानंतर बचत गटाच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील.  लाभाची हस्तांतरण रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. मिनी ट्रॅक्टर, ट्रॅक्टर व उपसाधनांची कमाल किमत 3 लाख 50 हजार रुपये  राहील. त्यामध्ये शासकीय अनुदान 3 लाख 15 हजार म्हणजेच 90 टक्के, स्वयंसहाय्यता बचत गटांचा हिस्सा 35 हजार रुपये म्हणजे उर्वरित 10 टक्के इतका  राहील.
अधिक माहिती व लाभासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांनी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, धुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर  सामाजिक न्याय भवन, साक्री रोड, धुळे येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्री. बागुल यांनी केले आहे.