Breaking News

पाचव्या दिवसाच्या बाप्पाला वाजतगाजत निरोप

जळगाव, दि. 31, ऑगस्ट - सर्वत्र गणेशोत्सव जोरात साजरा होत असून, आपल्या लाडक्या गणरायासाठी भक्त कामाला लागला आहे. जिल्ह्यात नुकतेच पाच  दिवसांच्या गणरायांचे विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडले. 
जिल्ह्यातील चोपडा, अडावदसह इतर तालुक्यात गणरायाचे विसर्जन करण्यात आले. चोपड्यात एकूण 65 सार्वजनिक गणेश मंडळांनी जवळील तापी नदीत गणेश  मूर्तीचे विसर्जन केले. तसेच अडावदलाही गणपती विसर्जन करण्यात आले.
चोपडा दुपारपासून गणेश मंडळांनी मिरवणूक काढून, लेझीम पथक घेऊन गणरायास निरोप दिला. जळगाव येथील नर्सिंग महाविद्यालयातर्फे स्थापन करण्यात पाच  दिवसाच्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत गणरायाच्या जयजयकारासह विद्यार्थीनींनी प्रचंड जल्लोष केला. अत्यंत धुमधडाक्यात गणरायाची विसर्जन मिरवणूक  महाविद्यालयाच्या परिसरातून काढण्यात आली.
गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे आज पाच दिवसाच्या गणरायाला निरोप देण्यात आला. सुरुवातील महाविद्यालयाच्या परिसरात  गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी रथाची आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते गणरायाची  आरती करण्यात आली. त्यानंतर लेझीम डान्स, दांडिया डान्स, प्रात्याक्षिकांची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थीनींनी नृत्याची धम्माल करीत दमदार  प्रात्याक्षिकेही सादर केली.
यावेळी नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्र पुराणिक, निवेदिता पुराणिक, अश्‍विनी वैद्य, प्रविण कोल्हे यांच्यासह महाविद्यालयाचे स्टाफ उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना यश मिळो ही गणराया चरणी प्रार्थना- डॉ. उल्हास पाटील
पारितोषिक वितरणानंतर माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, नर्सिंग महाविद्यालयाची विसर्जन मिरवणूक अत्यंत दर्जेदार आहे.  तसेच विद्यार्थीनींनी सादर केलेले नृत्य आणि प्रात्याक्षिके ही विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण आहे. अशा हरहुन्नरी विद्यार्थ्यांना सदैव यश मिळो ही गणराया चरणी प्रार्थना  असल्याचे माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले.
विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशे आणि डीजेच्या तालावर विद्यार्थींनीनी ठेका धरत जोरदार नृत्य केले. तसेच गणपती बाप्पा मोरया, एक दोन तीन चार, गणपतीचा  जयजयकार, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयजयकार करीत गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत विद्यार्थीनींनी चांगलीच धम्माल केली. विद्यार्थीनींनी गणरायाला  भावपुर्ण वातावरणात निरोप दिला.