Breaking News

40 वर्षांत उजनी 29 वेळा 100 टक्के भरले

सोलापूर, दि. 31, ऑगस्ट - गेल्यादहा दिवसांतील पुणे जिल्ह्यात पडलेल्या दमदार पावसाने बुधवारी उजनी धरण 100 टक्के भरले. दौंडमधील 73 हजार 574  क्युसेक विसर्गामुळे बुधवारी रात्री दहा वाजता धरणाच्या 15 दरवाजांतून 50 हजार क्युसेक पाणी भीमा नदीत सोडण्यात येत आहे. धरणात 100.45 टक्के  पाणीपातळी झाली होती. 40 वर्षांत उजनीने 29 वेळा 100 टक्के भरले आहे. 20 ऑगस्टपासून धरणात 58 टक्के पाणी आले. नदीकाठच्या गावांना सावधानतेचा  इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्यातील 11 धरणांतून मंगळवारी रात्री 72 हजार क्युसेकने सोडलेले पाणी बुधवारी सकाळी दौंड येथे पोहोचले. दौंडच्या विसर्गात  सकाळपासून वाढ होण्यास सुरुवात झाली. मंगळवारी सायंकाळी दहा वाजता उजनीच्या आठ दरवाजांतून 10 हजार क्युसेक पाणी सोडले होते. बुधवारी दुपारी 12  वाजता त्यात वाढ करून 16 दरवाजांतून 40 हजार क्युसेक पाणी सोडले. सायंकाळी आठ वाजता 40 हजारांचा विसर्ग कायम होता. रात्री दहा वाजता पुन्हा 15  दरवाजे 1.12 सेंटीमीटर उचलून 10 हजारांनी वाढवून 50 हजार क्युसेक पाणी सोडले. बंडगार्डन येथून 25 हजार 217 क्युसेक पाणी येत आहे. दरम्यान, पुणे  जिल्ह्यातील विसर्गात 20 हजारांची घट झाली आहे. सायंकाळी 13 धरणांतून 51 हजार क्युसेक पाणी सोडले होते. सध्या उजनी धरणात एकूण 117. 17 टीएमसी  पाणीसाठा आहे. 53.11 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. 63. 66 टीएमसी अचल साठा असलेल्या या धरणात 53.57 टीएमसी उपयुक्त साठा मानला जातो.  111 टक्के भरण्याची त्याची क्षमता आहे. 121 टीएमसी पाणीसाठा होतो. भीमा-सीना जोड कालव्यातून 900 क्युसेक, उजनी कालव्यातून 3000 क्युसेक,  वीजनिर्मितीसाठी 1500 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. धरणाची निर्मिती 28 सप्टेंबर 1977 रोजी झाली. 40 वर्षांत उजनी 29 वेळा शंभर टक्के भरले. यापूर्वी  2009 मध्ये सर्वात कमी भरले होते. तर जून 2015 मध्ये सर्वात निचांकी पातळी वजा 53.39 टक्के होती.2012-2015 चा अपवाद वगळता 2012 पूर्वी धरण  सलग नऊवेळा शंभर टक्के भरले होते. गतवर्षी ऑक्टोबर रोजी 100 टक्के भरले होते. यावर्षी 31 दिवस आधी उजनी शंभर टक्के भरले.