Breaking News

पोलीस आणि गणेश भक्तांसाठी मिनी हॉस्पिटलचे उद्घाटन

पुणे, दि. 26, ऑगस्ट - विश्रामबाग फरासखाना पोलीस स्टेशनच्या आवारात मिनी हॉस्पिटलचे उद्घाटन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आले.  गणेशोत्सव काळात बंदोबस्तावरील पोलीस आणि गणेशभक्त यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या रुग्णालयाच्या माध्यमातून निरंजन सेवाभावी संस्थेमार्फत ही  वैद्यकीय सेवा मोफत देण्यात येते. यावर्षी या उपक्रमाचे सहावे वर्ष आहे.
अनेकदा गर्दीच्या वेळेत वैद्यकीय मदत रुग्णापर्यंत पोहोचण्यास विलंब होतो. त्यामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी निरंजन सेवाभावी संस्थेमार्फत मोफत  वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहे. या मिनी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या औषधांसह 5 बेडसह अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये महिलांकरीता  स्वतंत्र विभाग करण्यात आला आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीकरीता सर्व यंत्रणेसह डॉक्टर व नर्सची अशी 20 जणांची टीम सज्ज आहे.
या हॉस्पीटलच्या उद्घाटनप्रसंगी महेश नागरी मल्टी.को.ऑप सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष धनराज राठी, मगराज राठी, युनिव्हर्सल हॉस्पिटलचे डॉ. अनंत बागुल,  पारख फार्मास्युटिकल्सचे संदिप पारख, अप्पर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, दगडूलाल बाहेती, संस्थेचे  अध्यक्ष जयेश कासट, ब्रह्मानंद लाहोटी, अजय झंवर, जगदीश मुंदडा आदी उपस्थित होते.