Breaking News

चोरट्यांनी स्टेट बँकेचे एटीएम मशीनच पळवले, 15 लाखांवर डल्ला

पुणे, दि. 26, ऑगस्ट - चोरट्यांनी दरोडा टाकत चक्क बँकेचे एटीएम मशीनच पळविल्याची घटना घडली आहे. ही घटना शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील  पाबळ चौकात घडली. चोरट्यांनी तेथील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम मशीन पळवून या एटीएम मशिनमधील पंधरा लाख रुपयांची चोरी केली आहे. ही घटना  मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
बुधवारी सकाळी पाबळ येथे बँकेच्या एटीम मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी कंपनीचे अधिकारी पोहोचले तेव्हा त्यांना मशीनच गायब असल्याचे दिसले. तसेच तेथील  सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा तुटल्याचे आढळले. त्यांनतर त्यांनी कंपनीला माहिती दिल्यानंतर कंपनीने सिस्टीममध्ये तपासणी केली असता ते मशीन बुधवारी पहाटे 4  वाजता बंद पडलेले दिसून आले. त्या एटीएम मशीनमध्ये 15 लाख 62 हजार रुपये शिल्लक होते.
या घटनेबाबत ईपीएस कंपनीचे एटीएम मॅनेजर इराप्पा चंदप्पा मेलेकरी (रा. ससाणेनगर, हडपसर, पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या  तक्रारीवरून शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही कॅमेरा तोडून चोरी केल्याने पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हान आहे. याप्रकरणाचा अधिक तपास  सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले करीत आहेत. या घटनेमुळे एटीएम मशीन व बँकांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.