Breaking News

सांगलीत गणपती संस्थानसह घरगुती व सार्वजनिक गणपतींचे उत्साहात आगमन

सांगली, दि. 26, ऑगस्ट - सांगली नगरीचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणरायाचे शुक्रवारी सांगली शहर व परिसरात मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात  स्वागत करण्यात आले. ऐतिहासिक परंपरा असलेल्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या श्री गणरायाचीही उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. यंदाच्या  गणेशोत्सवानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे श्री गणपती पंचायतन संस्थानच्यावतीने उद्या शनिवारपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विघ्नहर्ता व सुखकर्ता असलेल्या श्री गणरायाचे सांगली शहर व परिसरात आज मोठ्या भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. शुक्रवारी सकाळपासूनच  आपल्या लाडक्या श्री गणरायाला घरी नेण्यासाठी गणेशभक्तांची सुरू असलेली लगबग दिसून आली. त्यामुळे सांगली शहरातील दत्त मारूती रस्ता, हरभट रस्ता,  महात्मा गांधी रस्ता, शिवाजी मंडई परिसर, कर्मवीर भाऊराव पाटील चौक व राम मंदिर चौक आदी ठिकाणी गणेशभक्तांची श्रीं च्या मुर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी झाली  होती. त्यात बाल गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
उत्साही गणेशभक्त श्री गणरायाला सवाद्य मिरवणुकीसह वाजत- गाजत नेत असल्याने प्रमुख मार्गावरील व चौकातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे खोळंबून गेली होती.  गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया... या जयघोषांनी संपूर्ण सांगली शहर दुमदुमून गेले होते. शुक्रवारी सकाळच्या टप्प्यात घरगुती गणपतींचे, तर दुपारनंतर  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचे आगमन झाले. अनेक गणेशोत्सव मंडळांनी श्री गणरायाची सवाद्य मिरवणूक काढल्याने सायंकाळच्या सुमारासही प्रमुख  चौकातील वाहतूक व्यवस्था काहीकाळ ठप्प झाली होती.
श्री गणपती पंचायतन संस्थानच्या श्री गणरायाचेही आज मोठ्या उत्साही वातावरणात आगमन झाले. सांगली संस्थानच्या राजकन्या अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन-  दासानी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. तत्पूर्वी पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या या श्री गणरायाच्या मिरवणुकीत  सांगलीकर गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
श्री गणपती पंचायतन संस्थानच्या राजवाडा परिसरातील गणेशदुर्गातील दरबार या सभागृहात शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास श्री गणरायाची मोठ्या  थाटामाटात प्रतिष्ठापना करण्यात आली. सांगली संस्थानचे अधिपती श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन व पटवर्धन कुटुंबियांच्यावतीने विधीवत पूजा करण्यात आली.  त्यानंतर पानसुपारी व प्रसाद वाटपाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्यासह राजलक्ष्मीराजे पटवर्धन, भाग्यश्री पटवर्धन- दासानी,  हिमालयराजे दासानी, शिवसेनेचे नेते दिगंबर जाधव, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील व सांगली महापालिकेच्या नगरसेविका श्रीमती अश्‍विनी खंडागळे  यांच्यासह गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेशोत्सवानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणपती पंचायतन संस्थानच्यावतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात शनिवार  दि. 26 ऑगस्ट रोजी अंतरंग- निनाद प्रस्तुत महेश हिरेमठ व भक्ती साळुंखे यांचा मराठी व हिंदी गीतांची मैफल, रविवार दि. 27 ऑगस्ट रोजी निलेश जोशी व  संदीप वाडेकर यांच्या हिंदी व मराठी गाण्यांचा स्वरनक्षत्र हा कार्यक्रम, सोमवार दि. 28 ऑगस्ट रोजी महिलांसाठी हळदी- कुंकूचा कार्यक्रम व अभिषेक पटवर्धन  यांचा भक्तीरंग हा कार्यक्रम, तर मंगळवार दि. 29 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता श्री गणरायाच्या विसर्जनाचा रथोत्सव आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.