Breaking News

गोरखपूर बाल मृत्यू प्रकरणी सहा जणांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल

लखनौ, दि. 24, ऑगस्ट - गोरखपूर जिल्ह्यातील बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयातील बालमृत्यू प्रकरणी सहा जणांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात  आले आहेत. मुख्य सचिव राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने मंगळवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अहवाल सादर केला  असल्याची माहिती राज्य सरकारच्या प्रवक्त्यांनी दिली. यानंतर पुढील कार्यवाहीला सुरुवात झाली आहे.
मुख्य सचिव राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखालील समितीत आरोग्य विभागाचे सचिव आलोक कुमार व अर्थ विभागाचे सचिव मुकेश मित्तल हे सदस्य होते.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रधान सचिव (वैद्यकीय शिक्षण) अनिता भटनागर जैन यांची बदली करण्यात आली. महसूल विभागाचे प्रधान सचिव राजेश दुबे यांच्याकडे  विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
वैद्यकीय महाविद्यालया ज्या अधिका-यांकडून निष्काळजीपणा झाला असेल त्यांच्या विरोधातही फौजदारी खटले दाखल करण्याची शिफारस चौकशी समितीने केली  आहे. 67 लाख रुपयांचे देणे थकीत राहिल्याने ऑक्सिजनचा पुरवठा रोखणा-या ॠपुष्पा सेल्स’ या खाजगी कंपनी विरोधातही कार्यवाही करण्याची शिफारस  करण्यात आली आहे. यानुसार एकूण सहा जणांबरोबरच ॠपुष्पा सेल्स’ कंपनी विरोधातही फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ  अधिका-यांनी दिली.
गोरखपूरचे जिल्हा न्यायदंडाधिकारी राजीव रौटेला यांचा अहवालही चौकशी समितीच्या अहवालाबरोबर जोडण्यात आला आहे. रौटेला यांच्या अहवालात माजी प्राचार्य  राजीव मिश्रा व भूलतज्ञ (नेस्थेशिया) विभागाचे प्रमुख सतीश कुमार यांच्यावर ऑक्सिजनचा पुरवठा नियमित न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. ऑक्सिजन  सिलेंडरचे नोंदणी व साठा पुस्तिका न ठेवल्याप्रकरणी औषध विभागाचे मुख्य अधिकारी गजानन जैस्वाल यांनाही दोषी ठरवण्यात आले.