Breaking News

डिव्हिलियर्सचा कर्णधार पदाचा राजीनामा

जोहान्सबर्ग, दि. 24, ऑगस्ट - दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्स कर्णधारपदावरुन पायऊतार झाला आहे. त्याने ट्विटरवर शेअर केलेल्या  व्हिडिओद्वारे याबाबत माहिती दिली. डिव्हिलियर्सनंतर आता दक्षिण आफ्रिकेचा कसोटी आणि टी-20 कर्णधार फाफ डूप्लेसीकडे वन डे संघाच्या कर्णधारपदाची धुरा  देण्यात येण्याची शक्यता आहे.क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये आपण खेळणार असल्याचंही डिव्हिलियर्सने स्पष्ट केलं. वन डे आणि टी-20 मध्ये लक्ष केंद्रित  करण्यासाठी अगोदरपासूनच डिव्हिलियर्स कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिका संघाचं प्रतिनिधित्व करत नाही. संघासाठी मी किती धावा काढू शकतो आणि किती झेल घेऊ  शकतो, याची खात्री देऊ शकत नाही. पण माझ्याकडून मी 100 टक्के देण्याचा प्रयत्न करेन. 2004 साली जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हापासूनच  यानुसार मी खेळत आहे आणि अखेरपर्यंत असंच खेळत राहिल, असं डिव्हिलियर्सने म्हटलं आहे.
डिव्हिलियर्सने 106 कसोटी, 222 वन डे आणि 76 टी-20 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं आहे. कसोटीत त्याने 53.74 च्या स्ट्राईक रेटने  8074 धावा केल्या आहेत. तर वन डेमध्ये 9 हजार 319 धावा त्याच्या नावावर आहेत. शिवाय टी-20 मध्येही त्याच्या खात्यात 1603 धावा जमा आहेत.