Breaking News

शिक्षक प्रदिप शिंदे यांना राष्ट्रपति पुरस्कार जाहीर

अहमदनगर, दि. 31, ऑगस्ट - अकोले तालुक्यातील आढळा परिसरातील सावरगाव पाट येथील जेष्ठ नेते रमेशराव पवार यांचे भाचे व जिल्हा परिषदेच्या शिलापूर  (ता. नाशिक) येथील प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक प्रदीप रामचंद्र शिंदे यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्र सरकारच्या मनुष्याबळ विकास  मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागातर्फे शिक्षकदिनी होणार्‍या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते ते हा सन्मान स्विकारतील.
श्री. शिंदे एम.ए., एम.एड. आहेत. शिंदे यांचे शिक्षण इयत्ता पहिले ते सातवीपर्यंतचे सावरगाव पाट येथे झाले, 8 वी ते 10 वी समशेरपूर येथे अगस्ति विद्यालयात  झाले त्यानंतर डीएड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी अकोले शहरातील मॉडर्न हायस्कूल येथे अध्यापनाचे काम केले.
शिंदे यांनी सिन्नर घोटी महामार्गालगत हार्सुले येथे असलेली सुमारे 40 लाख रुपये किंमतीची चार गुंठे जमीन प्राथमिक शाळेसाठी दान केली. शिष्यवृत्ती परीक्षेत सुमारे  60 विद्यार्थी आतापर्यंत गुणवत्ता यादीत आले आहेत, शाळा डिजिटल आयएसओ ज्ञान रचनावादी लोकसहभागातून सुमारे दहा लाख रुपयांचे मदत गोळा करून  शाळेचा विकास प्रोजेक्टर कॉम्पुटर मुलांसाठी लेखन साहित्य टॅब, दप्तर, बूट, चप्पल, इत्यादी साहित्य, गरीब मुलांना सायकल वाटप करून शिक्षणाची संधी उपलब्ध  करून दिली.
शिक्षणाबरोबर त्यांनी शाळेत नावीन्यपुर्ण उपक्रम राबविले आहेत. गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून समाजाच्या सहभागातून  ते  मोफत शालेय साहित्य  उपलब्ध करुन देतात. राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, शिलापूर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास कहांडळ,  मुख्याध्यापिका नंदा मेतकर, पदवीधर शिक्षक नंदलाल अहिरे, सरपंच मीना कहांडळ, गटशिक्षणाधिकारी किरण कुंवर, विस्ताराधिकारी बी. डी. जगताप, शिक्षक  संघाचे राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे, आर. के. खैरनार यांनी अभिनंदन केले.