Breaking News

निळवंडेतून 17 हजार क्युसेकने प्रवरेत विसर्ग

अहमदनगर, दि. 31, ऑगस्ट - निळवंडे, भंडादरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे निळवंडे धरणामधून 17 हजार 300 क्यूसेक पाणी  सोडण्यात येत आहे. त्यामुळे प्रवरा नदीच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे.
निळवंडे, भंडारदरा धरणे महिनाभरापुर्वीच ओव्हरफ्लो झाली असून या दोन्ही धरणांतून कमी अधिक प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. काल सायंकाळपासून  भंडारदर्‍याच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर चांगलाच वाढला. त्यामुळे धरणात मोठया प्रमाणात पाण्याची आवक सुरु झाली. पहाटे तीन वाजताच भंडारदर्‍याच्या  स्पीलवेची दारे पुन्हा वर उचलावी लागली व धरणातून 8 हजार 323 क्यूसेक विसर्ग सुरु करण्यात आला. तर निळवंडे धरणाचा विसर्ग 10 हजार 666 क्यूसेकपर्यंत  वाढविण्यात आला. भंडारदरा पाणलोट क्षेत्राबाहेरही मुसळधार पाऊस पडल्यामुळे कृष्णावंतीसह ओढे नाले दुथडी भरुन वाहू लागले. त्यामुळे निळवंडे धरणात  पाण्याची मोठया प्रमाणात आवक सुरु झाली. निळवंडेचा विसर्ग दुपारी 15 हजार 200 क्यूसेक करण्यात आला. तर सायंकाळी भंडादरा धरणातून 9 हजार 17  क्यूसेक आणि निळवंडे धरणातून 17 हजार 300 क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. निंळवडेतून सोडण्यात येणार्‍या पाण्यामुळे प्रवरा नदीच्या पाणी पातळीत मोठी  वाढ झाली आहे. प्रवरेवरील छोटे फरशी पुल पाण्याखाली गेले असून त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूकीत व्यत्यय निर्माण झाला आहे.
आज सकाळपर्यंतच्या 24 तासात पाणलोट क्षेत्रात पडलेला पाऊस मिमी पुढीलप्रमाणे - घाटघर 66, रतनवाडी 90, पांजरे 97, भंडारदरा 71 तर निळवंडे 9 मिमी  पावसाची नोंद झाली. हरिश्‍चंद्रगड परीसरातील पावसामुळे मुळा नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. मुळा नदीचा विसर्ग सायंकाळी 6 हजार 592 क्यूसेक  इतका होता. जिल्हयातील सर्वात मोठे असणारे 26 टिएसचे मुळा धरण भरण्याच्या मार्गावर असून आज सकाळी मुळा धरणाचा पाणीसाठा 83 टक्के झाला होता.  धरणात 21 हजार 555 दलघफू पाणीसाठा होता. जायकवाडी धरणही 79 टक्के भरले आहे. जायकवाडीचा पाणीसाठा 80.577 टीएमसी एवढा झाला होता.  दुपारनंतर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला.