Breaking News

मुंबईतील मराठा मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी बाईक रॅली

पुणे, दि. 07, ऑगस्ट -  मुंबईत 9 ऑगस्टला मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर आज ठाणे, पुणे आणि यवतमाळमध्ये भव्य  मराठा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मराठा समाजाला आरक्षण, कोपर्डीप्रकरणातील आरोपींना फाशी, शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफीसारख्या इतर  मागण्यांसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.
पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन या मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील विविध भागांमध्ये फिरुन  रॅलीची सांगता डेक्कनमधल्या संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ होणार आहे. यवतमाळमध्येही मराठा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या मोर्चासाठी मोठ्या  संख्येनं युवक-युवती सहभागी झाले होते. शहारातील शिवाजी मैदानापासून बाईक रॅलीला सुरुवात झाली यानंतर संपूर्ण शहरभर ही रॅली फिरली.
याशिवाय ठाण्यातही जय भवानी जय शिवाजी म्हणत मराठा बाईक रॅलीमध्ये अनेक तरूणांनी सहभाग घेतला होता. ठाण्यातील तीन हात नाकापासून सुरू झालेल्या या  रॅलीची सांगता मासुंदा तलावा इथे झाली. यावेळी जागोजागी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.