Breaking News

राज्यसभेच्या 9 जागांसाठी मतदान, गुजरातमध्ये काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

अहमदाबाद, दि. 08, ऑगस्ट - गुजरात राज्यसभेच्या 3 जागांसाठी तर पश्‍चिम बंगालच्या 6 जागांसाठी आज (मंगळवार) मतदान होणार आहे. सकाळी 9 ते 4 या  वेळेत मतदान होईल. तर 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि संध्याकाळी सात वाजता निकाल जाहीर करण्यात येईल. सर्व 9 राज्यसभा खासदारांचा  कार्यकाळ 18 ऑगस्टला संपणार आहे. यामध्ये गुजरातच्या लढतीकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
बंडाच्या भीतीपोटी बंगळुरूच्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलेले काँग्रेसचे गुजरातमधले 44 आमदार पुन्हा गुजरातमध्ये परतले आहेत. या आमदारांना सध्या एका  रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत आमदारांनी दगाफटका करू नये म्हणून काँग्रेसचा खटाटोप सुरू आहे. पक्षाचे चाणक्य अशी ओळख  असलेले अहमद पटेल यांना कोणत्याही परिस्थिती राज्यसभेवर पाठवण्याचं आव्हान काँग्रेससमोर आहे. मात्र मध्यंतरी काँग्रेसच्या सहा आमदारांनी पक्षाला रामराम  ठोकत भाजपच्या तंबूत प्रवेश केला. यापुढे कोणताही आमदार फुटू नये म्हणून  आमदारांवर पक्षाची करडी नजर असणार आहे.
गुजरातमध्ये होत असलेल्या राज्यसभेच्या 3 जागांसाठी भाजपकडून भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि काँग्रेस सोडून आलेले बलवंत सिंह  निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर काँग्रेसकडून अहमद पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.