Breaking News

राज्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांचा 11 सप्टेंबरपासून बेमुदत बंद

रत्नागिरी, दि. 26, ऑगस्ट - शासनाच्या चालढकल धोरणामुळे अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनवाढीबरोबरच अन्य प्रमुख मागण्या शासनदरबारी धुळखात पडून  आहेत. शासनाच्या या वेळकाढू धोरणाविरोधात येत्या 11 सप्टेंबरपासून संपूर्ण राज्यात अंगणवाडी कर्मचार्‍यांचे बेमुदत बंद आंदोलन सुरू होणार आहे, अशी माहिती  अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जनरल सेक्रेटरी कमलताई परूळेकर यांनी लांजा येथील अंगणवाडी कर्मचारी मेळाव्यात दिली. अंगणवाडी कर्मचारी सभेच्या लांजा  शाखेतर्फे मार्गदर्शन मेळावा नुकताच झाला. त्यावेळी कमलताई परुळेकर बोलत होत्या. संघटनेच्या लांजा तालुकाध्यक्ष पुष्पा शेट्ये यांच्यासह पदाधिकारी आणि  अंगणवाडी सेविका यावेळी उपस्थित होत्या. परुळेकर म्हणाल्या की, सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी 3 वाजेपर्यंत अंगणवाडी सेविका व मदतनीस प्रामाणिकपणे  काम करतात. त्यांच्या कामाचे तास, जबाबदारी व त्यांचे परिसरात चालणारे कार्य व नोंदींचे काम लक्षात घेता त्यांना मिळणारे मानधन अतिशय तुटपुंजे आहे. महाराष्ट्र  वगळता अन्य राज्यांमध्ये त्यांना मानधन समाधानकारक मिळते. पाँडिचेरीमध्ये सेविकांना 19 हजार 480 तर मदतनिसांना 13 हजार 330, गोव्यात सेविकांना 15  हजार, तर मदतनिसांना साडेसात हजार रुपयांचे चांगले मानधन मिळते. मात्र पुरोगामी महाराष्ट्रात हेच मानधन सेविकांना पाच हजार तर मदतनिसांना अडीच हजार  याप्रमाणे दिले जाते. या विरोधात गेल्या दोन वर्षांपासून अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून शासनदरबारी लढा सुरू आहे. आंदोलनेही सुरू आहेत. मात्र  त्याला यश आलेले नाही. शासनाने 2016 मध्ये समिती नेमून मानधन वाढीसंदर्भात शिफारस करण्यास सांगितले होते. त्यानुसार या कमिटीने सेवाज्येष्ठतेनुसार  मानधन वाढ सुचविली होती. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये याबाबत तरतूद करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र ते हवेतच विरले. त्यानंतर 1 एप्रिल रोजी  पुकाण्यात आलेल्या संपानंतर महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी जूनअखेर मानधन वाढ करण्याचे मान्य केले होते. यानंतर 6 जूनला चर्चा तर 25 जूनला  पुन्हा आंदोलन पुकाण्यात आले. त्यावेळी आठ दिवसांत कार्यवाहीचे आश्‍वासन पंकजा मुंडे यांनी दिले होते. तेही आश्‍वासनही पूर्ण झालेले नाही. या पार्श्‍वभूमीमीवर  सरकारच्या वेळकाढू धोरणाचा निषेध करण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेने 11 सप्टेंबरपासून संप पुकारला आहे. त्यामध्ये सहभागी व्हायचे आवाहन कमलताई  परुळेकर यांनी केले. परिस्थितीचे गांभीर्य शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी अंगणवाडी कृती समितीच्या वतीने मासिक व इतर बैठकांवर बहिष्कार घालण्याचा  निर्णय घेण्यात आला आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची मानधनवाढ जाहीर होत नाही, तोपर्यंत सर्व शासकीय कार्यक्रमांवर बहिष्कार टाकून असहकार  आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी परुळेकर यांनी केले.