Breaking News

सार्वजनिक मंडळांसह घरोघरी लाडक्या बाप्पांचे आगमन

सातारा, दि. 26, ऑगस्ट - सार्वजनिक मंडळांसह घरोघरी लाडक्या बाप्पांचे आगमन आज झाले. विघ्नहर्त्या गणरायांच्या 11 दिवसांच्या उत्सवासाठी शाहूनगरी  गणेशमय झाली आहे. काल चतुर्थीच्या पूर्वसंध्येलाच साता-यात काही सार्वजनिक गणेश मंडळांनी वाजतगाजत व जल्लोषात गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेसाठी नेल्या. जिल्ह्यात  भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. त्यामुळे सातारा शहरासह अवघा जिल्हा बाप्पामय होऊन गेला आहे.
गणेशोत्सवाला आज शुक्रवारपासून दिमाखदार सुरुवात झाली. गणेशभक्तीचा महिमा सांगणार्या या उत्सवामुळे वातावरणात उत्साह संचारला आहे. गणेश चतुर्थीच्या  दिवशी आज सकाळी पर्यावरणाचा संदेश देणा-या पंचमुखी गणेश मंडळाच्या शाडूच्या 6 फुट सुंदर गणेश मूर्तीची मिरवणूक सकाळी अदालत वाडा येथून  ढोलपथकाच्या गजरात मिरवणूक निघाली. ही मूर्ती प्रसाद चव्हाण व सहकलाकारांनी केली आहे.सोनेरी वाघाच्या पुढे ऐटीत लोडाला टेकुन बसलेली ही सुंंदर मूती  पहाण्यासाठी मिरवणूकी दरम्यान गर्दी होत होती.या मिरवणूकीत पारंपारिक ऐतिहासिक वेष परिधान केलेले शिंग वाले लक्षवेधून घेत होते.तसेच या गणपतीवर  ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करण्यात येत होता. तसेच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
काल सायंकाळी ढोल पथकाच्या गजरात मोती चौकातील प्रतापसिंह मंडळाची, मानाच्या महागणपती सम्राट मंडळाचीही सायंकाळी मिरवणूक निघाली ढोलपथकांच्या  गजरात मिरवणूक सुरु असताना यावेळी गंधतारा, शिवब्रह्म, तांडव व भारतमाता ढोल पथकांची राजवाड्यावर जोरदार चुरस लागली होती. वाहतूक कोंडीही निर्माण  झाल्याने काही काळ गोंधळ उडाला.
आज शुक्रवारी दुपार नंतर अधून मधुन येणा-या पावसाच्या हलक्या सरींनी काही मिरवणुकीत व्यत्यय आला मात्र गणेशाच्या जोरदार जयघोषात पावसाचे विघ्न दूर  झाले.
दरम्यान, विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांबरोबरच घरोघरी अबालवृद्धांनी उत्साह दाखवला. बाप्पांच्या स्वागताच्या धांदलीने  जिल्ह्यातील वातावरण गणेशमय झाले होतेआज दिवसभर तर गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आलेेहोते. सार्वजनिक मंडळांबरोबरच घरोघरीही बाप्पांच्या स्वागताची  धांदल शिगेला पोहचली होती. शहरातीलफुटका तलाव मंडळाने दरवर्षी प्रमाणे यंदाही तरंगत्या तराफ्यावर नील वर्णीय मोराच्या सिंहासनावर बसलेलेी भव्य मुर्ती  कार्यकर्त्यांच्या हस्ते प्रतिष्ठापित केली.