Breaking News

एसटीसाठी जीएसटी फायद्याचा, शिवनेरी बसचं तिकीट स्वस्त

मुंबई, दि. 02 - जीएसटीमुळे काही वस्तू स्वस्त होणार आहेत, तर काही महाग. मात्र एसटी महामंडळासाठी जीएसटी फायद्याची ठरणार आहे. जीएसटी लागू होत  असल्याने शिवनेरी आणि शिवशाही बसचे दर आजपासून पाच ते सात रुपयांनी कमी होणार आहेत. एसटीच्या एसी बसभाड्यावर शंभर रुपयांमागे सहा टक्के सेवाकर  होता. जीएसटी लागू झाल्याने तो पाच टक्क्यांवर जाणार आहे. परिणामी एसटीच्या शिवनेरी आणि शिवशाही एसी बसचे दर पाच ते सात रुपयांनी कमी होईल, अशी  माहिती एसटी महामंडळातर्फे देण्यात आली.
ग्रामीण भागात धावणार्‍या एसटीच्या तिकीटात मात्र कोणताही बदल झालेला नाही. एसटी सेवा जीवनावश्यक आणि दैनंदिन सेवेत मोडते. जीएसटीतील प्रस्तावानुसार  अशा सेवांवर पाच टक्के कर लागू होतो. त्यामुळे एसटीच्या एसी बस प्रवाशांना जीएसटी लाभदायक ठरणार आहे. सध्या एसटीच्या ताफ्यात 125 एसी शिवनेरी आणि  दोन एसी शिवशाही बस आहेत. मुंबई-पुणे, ठाणे-पुणे, पुणे-औरंगाबाद, पुणे-नाशिक या मार्गांवर शिवनेरी; तर शिवशाही बस मुंबई-रत्नागिरी आणि पुणे-लातूर  मार्गावर धावतात.