Breaking News

संत श्री गजानन महाराज यांची पालखी 29 जुलै रोजी खामगावात

बुलडाणा,(प्रतिनिधी), दि. 25 - श्री. संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूर येथून शेगांवच्या परतीच्या मार्गावर आहे. पालखीचे  23 जुलै 2017 रोजी सिंदखेड राजा येथे आगमन झाल्यानंतर पालखी शेगांवकडे मार्गस्थ झाली आहे. पालखी 29 जुलै 2017 रोजी खामगांव येथे येत असून  सकाळी 10 ते सायं 7 वाजेपर्यंत खामगांव शहरातून प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करणार आहे. पालखीचा मुक्काम श्री. देवजी खिमजी मंगल कार्यालय, खामगांव येथे राहणार आहे. त्यानंतर 30 जुलै 2017 रोजी सकाळी 5 वाजता पालखीचे शेगांवकडे प्रयाण होणार आहे.  तरी पालखीतील भाविकांची संख्या व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी बघता खामगांव ते शेगांव, खामगाव- नांदुरा व बाळापूर नाका ते एसटी स्टँण्ड या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. 
बाळापूर नाका ते एसटी स्टँण्ड या मार्गावरील 29 जुलै 2017 चे सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत वाहतूक बाळापूर नाका- जनुना ढाबा- घाटपुरी- नांदुरा रोड- एमआयडीसी टर्निंग- सुटाळा बु.- जलंब नाका व बसस्टँण्ड या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. तसेच खामगांव ते नांदुरा  रस्त्यावरील वाहतूक 29 जुलै 2017 चे दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत खामगांव बसस्टँण्ड- बाळापूर नाका- जनुना ढाबा- घाटपुरी- नांदुरा रोड- एमआयडीसी टर्निंग- पुढे नांदुराकडे, जलंब जाण्याकरिता पुढे सुटाळा खुर्द व जलंब नाक्यापासून पुढे पर्यायी  मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.   खामगांव ते शेगाव रस्ता 30 जुलै 2017 चे सकाळी 4 ते दुपारी पालखी संपेपर्यंत खामगांव बसस्टँण्ड ते शेलोडी, तिंत्रव मार्गे शेगांव,  खामगांव बसस्टँण्ड ते जलब नाका- पुढे शेगांवकडे वाहतूक या पर्यायी मार्गाने राहणार आहे. खामगाव ते शेगाव रस्ता 12 तासापर्यंत संपूर्ण वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.