Breaking News

वादग्रस्त आगार व्यवस्थापक रविंद्र खेडेकरांची हकालपट्टी करा!

खेडेकरांच्या जाचाला कंटाळलेल्या कर्मचार्‍यांचा आंदोलनाचा इशारा 

बुलडाणा,(प्रतिनिधी), दि. 25 - आगार व्यवस्थापक रविंद्र खेडेकरांच्या जाचाला कंटाळलेल्या एस.टी.कर्मचार्‍यांनी दि.21 जुलै रोजी विभाग नियंत्रक रा.प.बुलडाणा यांना निवेदन देवून खेडेकरांची हकालपट्टी करा अन्यथा कर्मचार्‍यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येेईल, असा इशारा एस.टी.कर्मचार्‍यांनी दिला आहे. 
सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आगार व्यवस्थापक रविंद्र खेडेकर हे नेहमी वाहक व चालकांना अर्वाच्च भाषेत बोलतात. त्यांच्यावर याआगोदर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तरीही त्यांच्या कोणतीच कार्यवाही होत नाही. त्यांना खूप मोठा राजकीय वरदहस्त असल्याने ते महिला कर्मचार्‍यांना प्रचंड मानसिक त्रास देतात. त्यांच्या अनेक कारनाम्यांची चौकशी करण्यात यावी. त्यांनी जून, जुलै महिन्यात बर्‍याच चालक, वाहक यांच्या रजा नामंजूर केल्या होत्या आणि त्यांना विचारणा केल्यास उद्धटपणे बोलतात. तर आर.डी.वानखेडे, पालकर यांची रजा नामंजूर केली होती. आणि चालक खोडके यांची बदली मेहकर आगारात होवून एक वर्ष झाले तरीही त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नाही. तेथील दोन कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या असता त्यांना मात्र तात्काळ रुजू करुन घेतले. वाहक, चालक कोर्टाच्या तारखेवर जातात, त्यांची नियमानुसार हजेरी लावण्यात येत नाही. तर या आगोदर कामगार सेना व परिवहन मजदूर या दोन्ही संघटनांनी अनेकवेळा तक्रारी व निवेदन अर्ज देवूनसुद्धा राजकीय वरदहस्त असणार्‍या आगार व्यवस्थापक रविंद्र खेडेकर यांच्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळलेल्या कर्मचार्‍यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा विभाग नियंत्रकांकडे दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. सदर निवेदनावर व्ही.पी.पवार, आर.के.शेळके, व्ही.ई.पडघान, एम.जी.मछले, बी.डी.चव्हाण, एस.के.वानखेडे, एस.आर.जाधव, ए.एच.खान, पी.आर.जाधव, जे.बी.साळवे, एच.पी.सोनपसारे, व्ही.बी.पाटणकर, पवन साठे, एस.आर.डुकरे, एस.पी.जुमडे, ए.डी.नरोटे, एस.एन.मोकळे यांच्यासह साठ कर्मचार्‍यांच्या सह्या आहेत.