Breaking News

भंडारदरा 90 टक्के भरले; 3 हजार 436 क्युसेकने प्रवरेत विसर्ग

मुळा-भंडारदरा पाणलोटात पावसाचा जोर कायम,  निळवंडे 60 टक्के भरले          

अकोले, दि. 24 - मुळा, भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरुच असून आज सलग चौथ्या दिवशी पावसाने या परिसरास झोडपून काढले. उत्तर नगर जिल्हयाची जीवनरेखा असणारे भंडारदरा धरण भरल्यातच जमा असून आज याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. धरणातील पाणीसाठा 90 टक्के होताच सायंकाळी 6 वाजता धरणाची स्पीलवेची दारे एक फुटाने वर उचलण्यात आली. धरणातील पाणीपातळी नियंत्रीत करण्यासाठी भंडारदरा धरणातून सध्या 3 हजार 436 क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. 
प्रवरा नदीवरील निळवंडे हे दुसरे मोठे धरणही 60 टक्के भरले असून धरणात पाण्याची मोठया प्रमाणात आवक सुरु आहे. त्यामुळे निळवंडेही पाउस टिकून राहिल्यास याच आठवडयात ओव्हरफ्लो होण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास निळवंडे व भंडारदरा ही दोन्ही धरणे जुलै महिन्यातच भरण्याचा योग साधला जाईल.
मुळा धरणाच्या पाणीसाठयाही मोठी वाढ होत असून हे धरण 55 टक्के भरले आहे. मुळा नदीचा पूर अद्यापही टीकून असून सायंकाळी मुळा नदीचा विसर्ग 17 हजार 243 क्यूसेक होता.
आठवडाभरापासून मुळा, भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे. मागील चार दिवस पावसाने उग्र रुप धारण केले असून घाटघर, रतनवाडी परीसरात पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. त्यामुळे भंडारदरा धरणात पाण्याची मोठी आवक सुरु आहे. सकाळपर्यंतच्या 24 तासात भंडारदरा धरणात 1 टीएमसी पाण्याची आवक झाली. दिवसभराच्या 12 तासात 384 दलघफूटांची भर पडली. सध्या धरणात तासाला सरासरी 7 ते 8 हजार क्यूसेकने पाण्याची आवक सुरु आहे. आज सायंकाळी भंडारदरा धरणांचा पाणीसाठा 9 हजार 925 दलघफू होताच धरणाच्या स्पीलवेमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. सामान्यतः धरणाचा पाणीसाठा 10 हजार 500 दलघफूटांपेक्षा अधीक झाल्यानंतर धरण तांत्रीकदृष्टया भरले असे जाहीर केले जाते. मात्र यावर्षी धरणातील पाणीसाठा 90 टक्के होताच धरणाच्या वक्राकार स्पीलवेची दारे 1 फुट उचलण्यात आली व भंडारदर्‍यातील पाणी वेगाने बाहेर झेपावले. सध्या स्पीलवेमधून 2 हजार 436 जलविद्युत प्रकल्पातून 830 आणि आंब्रेला फॉलमधून 174 असे 3 हजार 440 क्यूसेक पाणी धरणातून प्रवरा नदीपात्रात पडत आहे. धरणातील पाणीसाठा उद्या 10 हजार 500 दलघफू होताच धरण भरल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले जाईल असे जलसंपदा विभागाच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.
भंडारदर्‍यातून मोठया प्रमाणात सोडलेले पाणी दुथडीभरुन वाहणार्‍या कृष्णवंतीचे पाणी आणि भंडारदर्‍यापासून निळवंडे धरणापर्यंतच्या दोन्ही बाजूंच्या ओढया नाल्यांचे पाणी यामुळे निळवंडे धरणाच्या पाणीसाठयातही मोठी वाढ सुरु आहे. दिवसभराच्या 12 तासात निळवंडे धरणात 279 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. सध्या भंडारदर्‍याचा 3 हजार 440 विसर्ग वाकीचा, कृष्णवंतीचा 2 हजार 200 क्यूसेक विसर्ग ओढया नाल्यांचे पाणी असे 7 ते 8 हजार क्यूसेक पाणी निळवंडे धरणात जमा होईल. आज सायंकाळी निळवंडे धरणाचा पाणीसाठा 5 हजार 58 दलघफू झाला होता. धरणात होणारी पाण्याची आवक लक्षात घेता. 8320 दलघफू क्षमतेचे हे धरण या आठवडयातच भरण्याची शक्यता आहे.
जिल्हयातील सर्वात मोठया मुळा धरणाचा पाणीसाठा 14 हजार 243 दलघफू झाला आहे. हे धरण 55 टक्के भरले आहे. दिवसभरात धरणाच्या पाणीसाठयात अर्धा टीएमसीपेक्षा अधिक 509 दलघफू पाण्याची आवक झाली. मुळा नदीचा विसर्ग 17 हजार 243 क्यूसेक आहे. त्यामुळे पुढील दोन तीन दिवसात मोठी वाढ अपेक्षित आहे.
तालुक्याच्या दक्षिण भागातील बेलापूर - बदगी (94.58 दलघफू) लघुपाटबंधारे तलाव भरुन वाहू लागला. तालुक्यातील भरलेला हा 12 वा तलाव. हे सर्व 12 तलाव काठोकाट भरुन ओसंडून वाहत आहे. देवठाण येथील आढळा धरणाच्या पाणीसाठयात दिवसभरात चांगली वाढ झाली. सायंकाळी आढळा धरणाचा पाणीसाठा 640 दलघफू झाला होता.
अकोले लगतच्या इगतपूरी तालुक्यासह नाशिक जिल्हयात पावसाने थैमान मांडले आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
सायंकाळी नांदुरमधमेश्‍वर जवळ गोदावरीचा विसर्ग 61 हजार 158 क्यूसेक होता. त्यामुळे जायकवाडी धरणाच्या साठयातही मोठी वाढ होणार आहे.
जायकवाडी धरण 45 टक्के भरले आहे. सकाळी जायकवाडीचा पाणीसाठा 46.232 टीएमसी होता. 24 तासात धरणात 1.9 टीएमसी पाण्याची आवक झाली.