Breaking News

कोल्हापुरात तुफान पाऊस, 5 बसमधील 250 प्रवासी अडकले

कोल्हापूर, दि. 21, जुलै - कोल्हापूर आणि परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याला तर नद्यांचं रुप आलं आहे. त्यामुळे  कोल्हापुरातून गगनबावडा मार्गे कोकणात जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. जोरदार पावसामुळंच गगनबावडा आणि कळे मार्गादरम्यान 5 खासगी बस अडकल्या  आहेत. रात्री 1 वाजल्यापासून जवळपास अडीचशे प्रवासी अडकले आहे.
या पाचही बस गोव्यातून गगनबावडा मार्गे पुण्याला जाता होत्या. मात्र रस्त्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. त्यामुळं हे प्रवाशी  आता मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. कोल्हापुरातल्या मुसळधार पावसामुळं काल नृसिंहवाडीतल्या दत्त मंदिरात कृष्णा नदीचे पाणी शिरलं. त्यामुऴं वर्षातील पहिला  दक्षिणद्वार सोहळा काल दुपारी चारच्या सुमारास पार पडला. सध्या कन्यागत पर्वकाळ सुरू असल्यानं आणि त्यातच काल  द्वादशी योगाची पर्वणी साधत भाविकांनी  दत्तच्या गजरात दक्षिणद्वार सोहळ्यात स्नानाचा लाभ घेतला.
नृसिंहवाडीत दत्तात्रेयांच्या पादुका असलेल्या मुख्य मंदिरात पुराचे पाणी गेल्यानंतर दक्षिणद्वार सोहळा होतो. मंदिराच्या उत्तरेकडील दरवाजातून पुराचे पाणी मंदिरात  जाते आणि पादुकावरून वाहते. त्यानंतर ते पाणी दक्षिण दरवाजातून बाहेर पडते म्हणून त्याला दक्षिणद्वार  सोहळा म्हणतात. पाणी अर्थात जीवन. मात्र हेच पाणी  जेव्हा आक्राळविक्राळ रुप धारणं करतं तेव्हा उरात धडकी भरवतं. कोल्हापूरसाठी वरदायिनी असेलल्या पंचगंगेनं धोक्याची पातळी ओलांडली आहे.