Breaking News

बोपण्णा-डॅब्रोव्हस्की जोडीने जिंकले ‘फ्रेंच ओपन’चे विजेतेपद

पॅरिस, दि. 09 - फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत सातव्या मानांकित भारताच्या रोहन बोपण्णा आणि कॅनडाच्या ग्रॅब्रियल डॅब्रोव्हस्की जोडीने स्पर्धेच्या  विजेतेपदावर आपले नाव कोरले. या जोडीने जर्मनीची ना-लेना ग्रोईनफेल्ड आणि कोलंबियाचा रॉबर्ट फराह या जोडीला 2-6, 6-2, 12-10 असे पराभूत केले.  पहिला सेट ग्रोईनफेल्ड-फराह जोडीने सहज जिंकला. दुसरा सेट समान फरकाने बोपण्णा-डॅब्रोव्हस्की जोडीने जिंकला. त्यामुळे तिसरा सेट अटीतटीचा होणार याची  चाहत्यांना खात्री होती. अपेक्षेप्रमाणे तिसरा सेट खूप वेळ चालला. अखेर 12-10 अशा फरकाने बोपण्णा-डॅब्रोव्हस्की जोडीने सेट जिंकला. या विजयाबरोबरच  बोपण्णाने कारकिर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम जिंकले. ग्रँड स्लॅम जिंकणारा बोपण्णा चौथा भारतीय टेनिसपटू ठरला आहे. या आधी मेहश भूपती, लिएंडर पेस आणि  सानिया मिर्झा यांनी ही कामगिरी केली आहे.