Breaking News

राष्ट्रपती निवडणुकीचं बिगुल वाजलं

नवी दिल्ली, दि. 08 - देशाचे 14 वे राष्ट्रपती निवडण्यासाठीचा कार्यक्रम आज निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. कोण होणार नवा राष्ट्रपती? प्रणव मुखर्जींचा  वारसदार नेमका कोण असणार? या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरं त्यामुळे लवकरच मिळतील. मोदी विरुद्ध सगळे अशा आणखी एका लढाईसाठी या निवडणुकीच्या  निमित्तानं मैदान सज्ज झालं आहे.
राष्ट्रपतीपदासाठी एकमत होऊ शकलं नाही तर 17 जुलैला मतदान आणि 20 जुलैला निकाल जाहीर होणार आहे. सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी याचा कार्यकाळ 25  जुलै रोजी संपतो आहे. एनडीए आणि यूपीए या दोन्ही बाजूंनी या निवडणुकीवरुन जोरदार खलबतं सुरु आहेत. नुकतीच दिल्लीत काँग्रेेस अध्यक्षा सोनिया गांधींनी या  निवडणुकीच्या रणनीतीसाठी विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. त्याला 17 पक्षांनी हजेरी लावलेली होती.
यूपीच्या महाविजयानंतर एनडीएचं संख्याबळ वाढलेलं आहे. शिवाय जगमोहन रेडड्डी यांचा वायएसआर काँग्रेस, तेलंगणा राष्ट्रसमितीचे के सी आर राव यांच्या पक्षानं  एनडीएला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला आहे. पण तरीही यूपीएकडून तुल्यबळ लढत देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यूपीएनं उमेदवारांच्या शोधसमितीसाठी शरद पवार  यांना समन्वयक म्हणून नेमलेलं आहे. त्यामुळे एखादा सर्वसहमतीचा उमेदवार पुढे येतो का हे ही पाहणं महत्वाचं आहे.