Breaking News

चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारताच्या पराभवाची चौकशी करा : रामदास आठवले

बडोदा (गुजरात), दि. 01 - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा दारुण पराभव केला आणि विजेतेपदावर नाव कोरलं. त्याला आता  पंधराहून अधिक दिवस उलटून गेले. मात्र, आता ‘रिपाइं’चे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भारताच्या पराभवाची चौकशी  करण्याची मागणी केली आहे. जिल्हास्तरावरील अधिकार्‍यांसोबत बैठकीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले गुजरातमध्ये आले होते.
चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाला. मात्र, इतकी मजबूत टीम पाकिस्तानसारख्या संघाकडून 180 धावांनी कशी पराभूत होऊ शकते?, असा  सवाल रामदास आठवलेंनी उपस्थित केला आणि भारताच्या पराभवाची चौकशी करण्याची मागणी केली. जगाचं लक्ष लागलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर पाकिस्तानने  आपलं नाव कोरलं. अंतिम फेरीत पाकिस्तानने टीम इंडियाचा तब्बल 180 धावांनी धुव्वा उडवला. पाकिस्तानला पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीचं जेतेपद मिळालं.
पाकिस्तानी संघाने ठेवलेलं 339 धावांचं डोंगराएवढं लक्ष्य पार करताना भारताची चांगलीच दमछाक झाली होती. हार्दिक पांड्याच्या 76 धावांच्या बळावर भारताला  सर्वबाद 158 धावांपर्यंतच मजल मारता आली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश करुन तिसर्‍यांदा जेतेपद मिळवण्याची स्वप्न पाहणार्‍या टीम इंडियाला दारुण  पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.