Breaking News

राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासात जपानने गुंतवणूक करावी - मुख्यमंत्री

मुंबई, दि. 03 - मुंबईसह राज्यात पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे खुप मोठ्याप्रमाणात सुरु असून या प्रकल्पांमध्ये जपान ने गुंतवणूक करावी, असे आवाहन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जपान सरकारच्या वाणिज्य- व्यापार आणि सहकारविभागाचे महासंचालक तात्सूया तेराझ्वा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्र्यांची सह्याद्री  अतिथीगृहात सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेशकुमार  जैन, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाचे आयुक्त युपीएस  मदान, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी श्यामलाल गोयल, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार महामेट्रोचे  व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
जपान आणि भारताचे त्यातही महाराष्ट्राचे नाते जवळचे आहे. यापूर्वीही महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पात जपानचे सहकार्य मिळाले असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री.  फडणवीस म्हणाले की, राज्यातील विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमधील गुंतवणुकीद्वारे हे नाते अधिक दृढ होईल. जपान सरकारने निर्देशित केलेल्या कंपनीच्या  माध्यमातून किंवा कोणत्याही कंपनीच्या सहभागाशिवाय थेट शासन ते शासन अशा स्वरूपातही हे सहकार्य विकसित करता येऊ शकेल.निधीच्या उपलब्धतेबरोबर  जपान अत्याधुनिक तंत्रज्ञानासह त्यांच्या इतर क्षेत्रातील कौशल्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीसाठी पुढे येऊ शकतो, त्याचे निश्‍चित स्वागत  आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यातील विविध पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्पांमध्ये गुंतवणुक करण्यास जपान उत्सुक असल्याचे यावेळी श्री. तेराझ्वा  यांनी सांगितले. परस्परांमधील सहकार्य वृद्धींगत होण्यासाठी ही चर्चा अतिशय उपयुक्त सिद्ध होईल, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.