Breaking News

प्लॅस्टिकमुक्त नाशिकसाठी एकत्रित प्रयत्न करावे-प्रकाश जावडेकर

नाशिक, दि. 07 - नाशिक शहर प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी आतील सर्वात स्वच्छ शहर व्हावे यासाठी लोकप्रतिनिधी स्वयंसेवी संस्था विद्यार्थी आणि नागरीकांनी  एकत्रित प्रयत्न करावे, असे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.
जेलरोड येथील वॉर्ड क्रमांक 18 येथे आयोजित स्वच्छता मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी,  उपमहापौर प्रथमेश गिते, नगरसेवक विशाल संगमनेरे , लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.
जावडेकर म्हणाले, शहर आणि ग्रामीण भागात दररोज 15 हजार टन प्लॅस्टिक कचरा फेकला जातो त्यापैकी सहा हजार टन कचरा उचलला जात नाही. देशात  वर्षाला 20लाख टन प्लॅस्टिक कचरा विखुरलेल्या स्वरुपात पडून असल्याने आणि तो विघटनशील नसल्याने पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे प्लॅस्टिक कचरा  कचराकुंडीत टाकण्याची सवय लागणे आवश्यक आहे. महापालिकेने शहरात प्लॅस्टिक कचर्‍यासाठी कचरा कुंडीची व्यवस्था करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
‘स्वच्छ भारत’ जनतेने स्वीकारलेला कार्यक्रम आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षात साडे तीन कोटी शौचालय बांधण्यात आले आणि एक लाख 70 हजार गावे हागणदारी  मुक्त झाली. शौचालय वापरण्याकडे देखील ग्रामीण भागातील जनतेचा कल वाढत आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक महिन्याला प्लॅस्टिक कचरा स्वच्छतेचा आढावा  घेणार असल्याचे ते म्हणाले.
जावडेकर यांनी जेलरोड परिसरातील प्लास्टिक कचरा स्वच्छ करण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला. त्यांनी रेल्वे स्टेशन परिसरातील व्यावसायिकांची भेट घेऊन त्यांना  दुकानाबाहेर कचराकुंडी ठेवण्याचे आवाहन केले. नगरसेवकांनी महिन्यातील एक दिवस आपल्या वार्डात प्लॅस्टिक कचरा संकलनाची मोहिम आयोजित केल्यास शहर  स्वच्छ होईल, असे ते म्हणाले. जेलरोड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पणमोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.