Breaking News

पोलिसांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका - मेहबुबा मुफ्ती

श्रीनगर, दि. 24 - पोलिसांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका, असा इशारा काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दिला आहे . श्रीनगरमध्ये मशिदीबाहेर पोलीस उपअधीक्षक मोहम्मद अयुब पंडित यांची जमावाने बेदम मारहाण करून हत्या केल्याच्या घटनेबाबत त्या बोलत होत्या. ही घटना अत्यंत लाजिरवाणी आहे, असेही त्यांनी नमूद केले.
त्या म्हणाल्या की, ’पोलिसांच्या संयमाचा असाच अंत पाहत राहाल तर पुढील काही दिवसांत अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. हे असे किती दिवस चालणार आहे ? जर असेच सुरू राहिले तर जशी आधी पोलिसांची जीप पाहताच लोक पळून जायचे तीच स्थिती पुन्हा निर्माण होवू शकते. पोलीस उपअधीक्षक पंडित हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी तेथे तैनात होते. पोलीस हे नागरिकांच्या संरक्षणासाठी असतात हे नागरिकांनी समजून घ्यायला हवे. आपल्या वागण्यात बदल करण्यासाठी नागरिकांकडे अजूनही वेळ आहे, असे त्यांनी नमूद केले. मेहबूबा मुफ्ती पोलीस उपअधीक्षक पंडित यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाल्या होत्या.
पोलीस उपअधीक्षक मोहम्मद अयूब पंडित हे गुरुवारी रात्री मशिदीचा फोटो काढत आहेत असा जमावाचा गैरसमज झाला. त्यामुळे जमाव त्यांच्या दिशेने चालून गेला . बचावासाठी पंडित यांनी हवेत गोळीबार केला. या घटनेत 3 नागरिक जखमी झाले. त्यानंतर जमावाने पोलीस उपअधीक्षक पंडित यांच्यावर हल्ला केला. त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. हत्या करण्यापूर्वी त्यांना निर्वस्त्र करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.