Breaking News

शिष्यवृत्तीत भ्रष्टाचार करणार्‍यांवर गुन्हे दाखल करा!


बुलडाणा,दि.11 ः केंद्र शासनातर्फे दिल्या जाणार्‍या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षणशुल्क प्रकरणी बुलडाणा जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झालेला असून, या घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन बुलडाण्यातील सिटी न्यूजचे मुख्य संपादक जितेंद्र कायस्थ यांनी केली आहे.
यासंदर्भातील निवेदन कायस्थ यांनी 9 जून रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी बी.बी.महामुनी यांना सादर केले.निवेदनात कायस्थ यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण देणार्‍या अनेक शिक्षण संस्थाचालकांनी समाजकल्याण विभागाच्या अधिकार्‍यांशी संगनमत करून जिल्ह्यात व्यावसायिक शिष्यवृत्ती तथा शिक्षण शुल्कासंदर्भात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या व्यावसायिक शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशच घेतला नाही, अशा संस्थांनीही विद्यार्थ्यांची बनावट कागदपत्रे मिळविली, तसेच त्यांचे आपल्या संस्थांमध्ये प्रवेश दाखवून त्यांच्या नावावर बनावट पध्दतीने शिक्षण शुल्क तसेच शिष्यवृत्ती लाटली आहे. एकाच विद्यार्थ्याच्या नावावर वारंवार शिष्यवृत्ती लाटण्यात येऊन कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आलेला आहे. या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी 24 जुलै 2016 रोजी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याचा उल्लेखही कायस्थ यांनी या निवेदनातून केला आहे. या
प्रकरणी गठीत करण्यात आलेल्या एसआयटीच्या सदस्यांनाही भेटून आपण कारवाई करण्याची विनंती केल्याची माहिती कायस्थ यांनी यावेळी दिली. या शिष्यवृत्ती घोटाळ्यात जिल्ह्यात अनेक बडे मासे गुंतलेले असून यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेपदेखील असल्याचा आरोप करीत कायस्थ यांनी या
घोटाळ्यातील दोषींची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या तपासकामी त्यांनी विविध मार्गांनी मिळवेलली या घोटाळ्याची  कागदपत्रे अधिक पोलिस तपासासाठी उपलब्ध करून देण्याची तयारीही त्यांनी दर्शविली आहे. याशिवाय सन 2011-12 सालातील सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे एक बनावट बील भाजपच्या जिल्ह्यातील एका जबाबदार आणि सिक्रय महिला पदाधिकार्‍याच्या विशेष आग्रहावरून निघाल्याची माहिती कायस्थ यांनी महामुनी यांना दिली.
त्या महिला पदाधिकार्‍याचे पत्रदेखील आपल्याकडे उपलब्ध असल्याचे कायस्थ यांनी यावेळी सांगितले. निवेदन दिल्यानंतर एसडीपीओ महामुनी यांनी कायस्थ यांना, तुमच्याकडे असलेली सगळी माहिती आम्हाला द्या, आम्ही या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करू, असे ठोस आश्‍वासन दिले.