Breaking News

अखेर शेतकर्‍यांचा संप मागे, मध्यरात्री चार तास मॅरेथॉन बैठक

मुंबई, दि. 03 - राज्यातील शेतकर्‍यांनी अखेर दोन दिवसांनी संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मध्यरात्री चार तास झालेल्या मॅरेथॉन चर्चेनंतर शेतकर्‍यांनी हा निर्णय घेतला. शेतकर्‍यांच्या 70 टक्के मागण्या मान्य झाल्याचा दावा या बैठकीनंतर कऱण्यात आला. अल्पभूधारक थकीत कर्ज असलेल्या शेतकर्‍यांना 31 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफी देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. या बैठकीसाठी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह शेतकर्‍यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
रात्री साडेबाराच्या सुमारास सुरु झालेली बैठक पहाटे पावणे चारच्या सुमारास संपली आणि शेतकर्‍यांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली. शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा,   शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा आणि  शेतकर्यांना पेन्शन योजना लागू करावी, अशा विविध मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी 1 जूनपासून संपाची हाक दिली होती. त्याला राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळाला होता.
राज्यातील अल्पभूधारक शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यासाठी सरकारकडून एक समिती स्थापन करणार असल्याची घोषणा करण्यात आली असून, ही समिती 31 ऑक्टोबरपर्यंत आपला अहवाल सरकारकडे सादर करणार आहेत.