Breaking News

रात्रभर कोसळल्यानंतर पावसाची विश्रांती; रेल्वे सेवा विस्कळीत

मुंबई, दि. 27 - रात्रभर धो-धो कोसळणार्‍या पावसाने अखेर मंगळवारी सकाळी थोडीशी विश्रांती घेतली. मात्र याचा फटका नेहमीप्रमाणे मध्य व हार्बर मार्गावरील रेल्वेसेवेला बसला असून चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. रेल्वेरूळावर पाणी साचल्यामुळे मुंबई-सीएसटीकडे येणार्‍या मध्य रेल्वेच्या गाड्या 10 ते 15 मिनिटे उशीराने तर हार्बर लाईनवरील गाड्या 15-20 मिनिटाने उशीराने धावत आहेत. शीव स्थानकाजवळ रूळच पाण्याखाली गेल्याने मुंबईकडे येणार्‍या धीम्या मार्गावरील काही गाड्या माटुंग्यापर्यंत जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. सकाळी 6.30 दरम्यान कुर्ल्याजवळ झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे विद्याविहार ते कुर्ला स्थानकांमध्ये काही काळ गाड्यांची रांग लागली होती. अनेकांनी तर चालत स्थानक गाठणे पसंत केले.
याशिवाय, पावसामुळे मुंबई आणि उपनगरांत अनेक ठिकाणी पाणी साठले आहे. हिंदमाता, किंग्स सर्कल या भागांत पाणी वाहून जायला जागा नसल्यामुळे पाणी साचून राहिले असून वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. तसेच, पश्‍चिम मुंबईतील अंधेरी, जोगेश्‍वरी, विक्रोळी परिसरात पाणी साठले आहे.