Breaking News

शेतकर्‍यांवर खोटे गुन्हे दाखल केल्यास तीव्र आंदोलन करु!



बुलडाणा,दि.11: शेतकरी बांधवांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला खामगावात भाजप वगळता सर्वच पक्षांनी आपला पाठिंबा दिला होता. खामगावासीयांनी सुद्धा कडकडीत बंद पाडून या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. तरीदेखील पोलिसांनी राजकीय दबावापोटी कृषिमंत्री फुंडकर यांच्या आदेशानुसार शेतकर्‍यांवर नाहक खोटे गुन्हे दाखल केले. भविष्यात पुन्हा जर शेतकर्‍यांवर असे खोटे गुन्हे दाखल केले तर आम्ही अधिक तीव्र आंदोलन करु, असा इशारा सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक शशिकुमार यांना देण्यात आला. आज 10 जून रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय शिष्टमंडळाने बुलडाणा जिल्हा पोलिस अधीक्षक
शशिकुमार मीना यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शामभाऊ उमाळकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मणराव घुमरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे, अखिल भारतीय किसान सभेचे जितेंद्र चोपडे, प्रा.अनिल अंमलकार, संजय औताळे, महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेश उपाध्यक्षा मिनलताई आंबेकर, महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेश सरचिटणीस जि.प.सदस्या जयश्रीताई शेळके, वर्षाताई वनारे, प्रकाश पाटील, अ‍ॅड.माजिद कुरेशी, सतिश महेंद्रे, दिपक रिंढे, चित्रांगण खंडारे, शिवाजीराव इंगळे, सुनिल तायडे आदींची उपस्थिती होती. खामगावात 5 जून रोजी पुकारण्यात आलेल्या बंदला खामगाववासीयांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळून बंद यशस्वी केला. शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु असताना शहर पोलिसांनी सर्वपक्षीय नेत्यांना, शेतकरी बांधवांना दुपारी 1 वाजता डिटेन करुन शहर पोलिस स्टेशनला आणले. दुपारी 2 वाजता सोडून दिले.
कोणत्याही दुकानदाराची अथवा ट्रकचालकाची तक्रार नसताना राजकीय दबावापोटी कृषीमंत्री फुंडकर यांच्या आदेशावरुन पोलिसांनी स्वत: फिर्यादी होवून हे आंदोलन करणार्‍या शेतकरी बांधवांवर कलम 341,143, 283 भादंविसह कलम 135, मुंपोका नुसार गुन्हे दाखल केले. याचप्रमाणे दिनांक 12 व 13 जून रोजी शेतकर्‍यांच्या
मागण्यांसाठी जिल्ह्यात विविध आंदोलन पुकारण्यात आले आहे. हे आंदोलन चिरडण्यासाठी सुद्धा कृषिमंत्री फुंडकर यांच्या आदेशावरुन पोलिसांनी शेतकर्‍यांना नोटीस देवून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. याचा देखिल शिष्टमंडळाने निषेध केला आहे. आजपर्यत आम्ही जे आंदोलन केले आहे, ते शांततेच्या मार्गाने केले असून कधीही कायदा हातामध्ये घेतलेला नाही. व ती आमची संस्कृतीदेखील नाही. भविष्यातही शेतकर्‍यांसाठी कितीही आंदोलन करायचे असल्यास आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत राहू, तसेच कायदा व सुव्यवस्थेसाठी सदैव सहकार्य करु असे आमदार सपकाळ यांनी यावेळी सांगितले. यावर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, जो गुन्हा दाखल झालेला आहे, त्याचा आम्ही तपास करु, तपासाअंती न्यायोचित कार्यवाही करु अशी ग्वाही दिली. या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक शशिकुमार
मीना यांच्यासोबत जवळपास अर्धातास चर्चा केली.