लातूर कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष बेंद्रे यांचा कॉग्रेसला रामराम
लातूर, दि. 07 - लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ विधिज्ञ व्यंकट बेंद्रे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा बेद्रे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याकडे 28 मे रोजी पाठवला आहे. बेंद्रे यांनी या कृतीमागचे कारण सांगितले नाही. लोकनेते विलासरावांचे खंदे समर्थक म्हणून बेंद्रे यांनी मोठी जबाबदारी सांभाळली होती. मात्र नंतर लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पश्चात बेंद्रे यांची अस्वस्थता वाढली होती.लातुरच्या नगराध्यक्षपदाची धुरा समर्थपणे पेलणा-या बेंद्रे यांचे पक्ष बांधणीत मोठे योगदान आहे. त्यांच्या कारकिर्दीत काँग्रेसने अनेक निवडणुका जिंकल्या. बेद्रे यांचे लातुरसह प्रदेश काँग्रेसमध्येही चांगले वजन आहे. पक्षातील नाराजी हेच या राजीनाम्यामागचे कारण असावे असा तर्क लावला जात आहे. त्यांचा राजीनामा अद्याप स्विकारण्यात आलेला नाही. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्षांकडून सुरु असल्याचे खात्रीलायकरित्या समजते. बेंद्रे यांच्या राजीनाम्याचे नेमके काय होते याकडे लातुरकरांचे लक्ष लागले आहे.