Breaking News

जीएसटीमुळे देशातील महागाई कमी होणार : अरुण जेटली

नवी दिल्ली, दि. 01 - जीएसटीचा लोकार्पण सोहळ्याला संसदेच्या मुख्य सभागृहात संपन्न झाला. या ऐतिहासिक कार्यक्रमात बोलताना अर्थमंत्री अरुण जेटलींनी  देशाच्या अर्थव्यवस्थेत मध्यरात्रीपासून नवं पर्व सुरु झालं असल्याचं सांगितलं. तसेच जीएसटीमुळे महागाई कमी होईल, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.  अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की,  देशभरात जीएसटी लागू करण्यासाठी गेल्या 15 वर्षांपासून चर्चा सुरु होती. अखेर आज ही व्यवस्था संपूर्ण देशभरात लागू  असून, आता देशात एक देश, एक कर आणि एक बाजार अस्तित्वात येईल.
तसंच देशभरात जीएसटी करप्रणाली लागू करण्यासाठी जीएसटी काऊन्सिलच्या एकूण 18 बैठका झाल्या असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. यात बैठकीत  दोन-दोन दिवस प्रदीर्घ चर्चा झाली. पण एकदाही यासाठी मतदान घेण्याची वेळ आली नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. या करप्रणालीचं वैशिष्ट्य सांगताना अरुण  जेटली म्हणाले की, या करप्रणालीमध्ये जीएसटीवर आणखी कर आकारला जाणार नाही. त्यामुळे देशभरात वजन काटे असणार्‍या नाक्यांवर ट्रक आणि अवजड  वाहनांची गर्दी होणार नाही. तसेच महागाईवरही लगाम घातलं जाईल. विशेष म्हणजे, यामुळे टॅक्सी चोरी करणे अवघड होणार असून, करवसुलीने देशाच्या  विकासदरात मोठी वाढ होईल, असं सांगितलं.
जीएसटी करप्रणाली लागू होण्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार यांना जो काही फायदा होईल, त्याचा सर्वाधिक लाभ गरिबांना मिळेल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट  केलं. तसेच ही करप्रणाली लागू करण्यासाठी सर्व राज्यांनी आणि विविध पक्षांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.