Breaking News

सांगलीत भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी

सांगली, दि. 27 - हरिपूर गावामध्ये भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये काल तुफान हाणामारी झाली. या प्रकरणी 65 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, तक्रार दाखल करण्यास गेले असता पोलिसांनीच मारहाण केल्याचा आरोप या प्रकरणातील एका गटाने केला आहे. सांगलीतल्या हरिपूर गावात राजकीय वर्चस्वासाठी काल भाजपच्या बोंद्रे आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाकडे गटात काठ्या आणि दगडाने तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्हीही गटातल्या 3 चारचाकी फुटल्या तर 3 जण जखमी झाले आहेत.
यानंतर गावात तणावाचं वातावरण निर्माण झाल्याने, पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता. विशेष म्हणजे, या प्रकरणी तक्रार दाखल करण्यास गेले असता पोलिसांनीच मारहाण केल्याचा आरोप यातील फाकडे गटाने केला आहे.
दरम्यान, याआधी देखील दोन्ही गटांमध्ये राजकीय वर्चस्वासाठी हाणामारी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. तीन दिवसांपूर्वी अंकलीत बोंद्रे गटाचे समर्थक कामानिमित्त सांगलीकडे चालले होते. त्यावेळी फाकडे गटाच्या समर्थकांनी आपली दुचाकी आडवी लावली. यावरुन बोंद्रे आणि फाकडे गटामध्ये धुसफूस सुरु होती. याप्रकरणी तक्रार दाखल करण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. पण तरीही यासाठी कोणी पुढाकार घेतला नव्हता. पण काल या दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. यावेळी तीन वाहनांची तोडफोड करण्यात आली, तर तीन जण जखमी झाले. विशेष म्हणजे, दोन्ही गटातील हाणामारी सांगलीतील शास्त्री चौक परिसरातपर्यंत पोहचली होती. या प्रकरणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अरविंद तांबवेकर यांच्या मुलासह दोन्ही गटाच्या एकूण 65 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.