श्री शिवाजी महाविद्यालयाची मान्यता रद्द करा!
सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, बुलडाणा यांनी संचालक उच्च शिक्षण व विद्यापीठाकडे पाठविला प्रस्ताव
बुलडाणा, दि. 17 - श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय, चिखली येथील प्राचार्य एन.बी.भुसारी यांनी महाविद्यालयीन शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांकडून अनधिकृत शुल्क वसूल केल्याने तसेच स्वत:च्यामुलाला व महाविद्यायलीन प्राध्यापकांच्या मुलांना नियमबाह्य फ्रीशिप शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून देवून शासनाची व प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर शासननिर्णय 1 नोव्हेंबर 2003 नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी समाजकल्याण कार्यालय, बुलडाणास्तरावरुन समिती गठीत करण्यात आली होती. समितीच्या तपासणी अहवालानुसार महाविद्यालयातील कार्यरत प्राचार्य एन.बी.भुसारी यांच्यावर चौकशी समिती अध्यक्ष एम.एम.मेरत, विशेष अधिकारी (शा.नि.शा.)यांच्या तक्रारीवरुन पोलिस स्टेशन चिखली येथे अपराध क्र.202/15 भादंवि कलम 409, 420 नुसार दि.16 नोव्हेंबर 2015 रोजी फौजदारी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार सहाय्यक आयुक्त समाजकल्याण बुलडाणा यांचे कार्यालयीन जावक्र/भासशि/महाविद्यालय/मान्यता रद्द/2336/ बुलडाणा दिनांक 13/06/2017 नुसार कुलगुरु संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्याकडे व संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे सदर महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे.या प्रकरणाचा पाठपुरावा सामाजिक कार्यकर्ते विलास खंडेराव यांनी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, बुलडाणा, जिल्हाधिकारी बुलडाणा, प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण विभाग, अमरावती, आयुक्त समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य पुणे तसेच सामाजिक न्याय विभाग मंत्रायलय मुंबई यांच्या कार्यालयाकडे श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय,चिखली येथील कार्यरत प्राचार्य एन.बी.भुसारी यांनी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांकडून अनधिकृत शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क वसूल केल्याबाबत व प्राचार्य भुसारी यांनी स्वत:च्या मुलाला व महाविद्यालयाच्या प्राध्यापकांच्या मुलांना नियमबाह्य फ्रीशिप शिष्यवृत्तीचा लाभ देवून शासनाची व प्रशासनाची फसवूणक केल्याबाबतच्या तक्रार केली होती. त्यानुसार समाजकल्याण बुलडाणाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त एन.सी.ढगे यांनी चौकशी समिती गठीत करुन सदर चौकशी समितीचे अध्यक्ष एम.एम.मेरत, विशेष अधिकारी(शा.नि.शा.) यांच्या अध्यक्षतेखाली प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. सदर चौकशीअहवालानुसार प्राचार्य भुसारी यांनी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांकडून अनधिकृत शुल्क वसूल केल्याचे निष्पन्न झाले. व भुसारी यांनी स्वत:च्या मुलास व इतर प्राध्याकांच्या मुलांना नियमबाह्य फ्रीशिप मिळवून दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. त्यामुळे या गंभीर स्वरुपाच्या व भुसारी यांनी केलेल्या वित्तीय अनियमिततेबाबत सन 2012-13 व सन 2013-14 या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती/शिक्षण शुल्क योजनेंतर्गत पात्र अनु.जाती, विजाभज, ईमाव, विमाप्र या प्रवर्गातील बी.ए./बी.कॉम या अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांकडून अनधिकृत रुपये 11,58,997/- वसूल करुनसुद्धा समाजकल्याण बुलडाणा कार्यालयाकडून रुपये 32,26,401/- ची शिष्यवृत्ती व शिक्षण फी योजनेची प्रतिपूर्तीची रक्कम महाविद्यालयाचे शिष्यवृत्ती खात्यामध्ये जमा होवूनसुद्धा सदर रक्कम विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली नाही. व भारत सरकार शिष्यवृत्ती लाभाकरीता इतर मागास प्रवर्गासाठी पालकाची उत्पन्न मर्यादा 4.5 लाख रुपये असताना प्राचार्य भुसारी यांनी स्वत:चे उत्पन्न व प्राध्यापकांचे उत्पन्न जास्त असून सुद्धा त्यांनी स्वत:चा मुलगा नामे अभिनव निळकंठ भुसारी यास व इतर प्राध्यापकांच्या मुलांना नियमबाह्यरित्या फ्रीशिपच्या सवलतीचा लाभ देवूनभुसारी यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करुन 15,97,195/- रुपयांचा अपहार केल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेवून सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण बुलडाणा यांनी कुलगुरु, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती व संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे सदर महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यावर विद्यापीठाचे कुलगुरु व उच्च शिक्षण संचालक काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
