Breaking News

माळीण पुनवर्सनावर प्रश्‍नचिन्ह !

दि. 28, जून - पुणे जिल्हयातील आंबेगाव तालुक्यातील माळीण हे छोटेसे गाव. तीन वर्षापूर्वी मुसळधार पाऊस झाल्यामुळे दरड कोसळून संपूर्ण गाव मातीच्या  ढिगार्‍याखाली गाडले गेले. तब्बल 151 लोक या ढिगार्‍यांखाली मृत्यूमुखी पडले. संपूर्ण गाव मातीच्या ढिगार्‍याखाली गाडल्या गेल्यामुळे आपत्ती व्यवस्थावर मोठया  प्रमाणात टीका झाली, पडकई योजनांवर अनेकांनी बोट ठेवले. मात्र काही दिवसांपूर्वीच माळीण गांवाचे पुनर्वसन करण्यात आले. सर्व सोयी सुविधांनी युक्त असे गाव  बनवण्यात आले. मात्र एक पाऊस झाला आणि पुन्हा चर्चेत आले ते माळीण गाव. पहिल्याच पावसात माळिण गावातील घरांना तडे गेले. गावातील अनेक रस्ते खचले  आहेत. तर भिंतींनाही मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थ स्थलांतर करण्याच्या मनस्थितीत आहेत. पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर 30 जुलै 2014  रोजी दरड कोसळल्याने संपूर्ण गाव मातीखाली गाडले गेले होते. साखरझोपेत असताना संपूर्ण गाव मातीखाली गेला होता. या दुर्घटनेत 151 जणांचा बळी गेला, तर  काहींचे संपूर्ण कुटुंब मातीखाली गाडली गेली होती. या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने माळीण गावचे पुनर्वसन करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 2 एप्रिल  रोजी माळीण गावच्या पुनर्वसनाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माळीण नव्याने बांधण्यात आलेल्या घरे, शाळा आणि मंदिरांचे बांधकामांचे लोकार्पण  करण्यात आले. आणि काही दिवसांत पहिल्याच पावसानंतर माळीण पुनर्वसनावर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. माळीण हे संपूर्ण गाव मातीच्या ढिगार्‍याखाली गाडले  गेल्यामुळे माळीण गावासाठी अनेकांनी मदतीचा ओघ सुरूच ठेवला. सरकारी पातळीवरही मोठी मदत झाली. मात्र पहिल्याच पावसामुळे माळीण गावाची अवस्था बिकट  झाली. रस्ते खचले, घरांना तडे गेले. प्रसारमाध्यांमध्ये बातम्या झळकल्या. मात्र या पुनर्वसनाची चौकशी होण्याची, यात  किती भ्रष्टाचार झाला, याची साधी चौकशी  देखील करण्याची मागणी कोणी केली नाही. देशात मरण स्वस्त होत आहे, असाच अनुभव देशातील नागरिकांना येत आहे. महाड शहरातील सावित्री नदीवरील पूल  कोसळून अनेकांना जलसमाधी मिळाली होती. माळीण गाव उध्दवस्त झाले होते. त्यातून आतातरी प्रशासन आणि सरकार धडा घेतील अशी अपेक्षा होती. मात्र पुन्हा  जैसे थै चा कारभार बघायला मिळाला. पारदर्शक कारभाराची आवड असलेले मुख्यमंत्री या घटनांकडे लक्ष देतील का? माळीण गावांचे पुनर्वसन करतांना शास्त्रीय  कारणांची मिमांसा केली का? रस्ते खचले, घराला तडे गेल, या कामाचे कंत्राट कुणाला दिले होते, याची चौकशी होणार आहे का? पुन्हा माळीण दुर्घटना  घडल्यानंतर प्रशासनासह सरकार खडबडून जागे होणार आहेत का ? असे अनेक प्रश्‍न निर्माण होत आहे. प्रशासनांच्या वतीने माळीण गावातील  पुनर्वसनावेळी तेथील  घरे ही अ‍ॅल्युफोर या नव्या तंत्रज्ञानाने बांधण्यात आली आहेत. ही घरे पारंपरिक बांधकाम केलेल्या घरांपेक्षा चारपट अधिक मजबूत आहेत, असा दावा करण्यात आला  होता. मग पहिल्या पावसात या घरांना तडे कसे गेले? त्यामुळे माळीण गावांच्या पुनर्वसनावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.