Breaking News

सरसकट कर्जमाफी केल्याने सरकार अभिनंदनाला पात्र : शरद पवार

औरंगाबाद, दि. 12 - शेतकर्‍यांची एकजूट ही समाधानकारक बाब आहे. सुकाणू समिती सगळे मतभेद दूर करून एकत्र आली आणि शेतकर्‍यांच्या पदरात सकारात्मक मिळालं. शिवाय सरकारनेही सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार आणि सुकाणू समितीचं अभिनंदन केलं. सरकार आणि सुकाणू समितीच्या बैठकीत कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर शरद पवारांनी आपली भूमिका मांडली. औरंगाबादमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दोन प्रकारचे कर्ज असतात. एक अल्प मुदतीचं कर्ज असतं आणि दुसरं दीर्घ मुदतीचं कर्ज असंत. मात्र सरकारने सरसकट कर्जमाफी केली आहे. त्यामुळे सर्वांचंच कर्ज माफ होईल, म्हणून सरकार अभिनंदनाला पात्र आहे. फक्त आता या निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, असंही शरद पवार म्हणाले.
यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. सरकारने खरीपाच्या तोंडावर कर्जमाफी दिली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना उद्यापासून नव्याने कर्ज उपलब्ध होईल. शेतकर्‍यांनी आता लवकरात लवकर नव्याने कर्ज पदरात पाडून घ्यावं, असंही पवार म्हणाले.