Breaking News

मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनात गोळीबार, 5 जणांचा मृत्यू

भोपाळ, दि. 07 - महाराष्ट्रात विविध मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन सुरु असतानाच मध्य प्रदेशातही शेतकर्‍यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन सुरु केलं आहे. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं असून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 5 शेतकर्‍यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी गोळीबार केला, ज्यामध्ये तीन शेतकर्‍यांचा मृत्यू झाला, तर काही शेतकरी जखमी झाले, असा आरोप आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांनी केला आहे. कर्जमाफीसाठी पुकारलेल्या या आंदोलनाला अचानक हिंसक वळण मिळालं.
आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांनी 10 ट्रक आणि दोन दुचाकी जाळल्या. पोलिसांनी जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र अचानक दगडफेक सुरु झाली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही शेतकर्‍यांना गोळ्या लागल्या. या घटनेनंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तातडीने न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. मध्य प्रदेशातील मंदसौर, रतलाम आणि उज्जैन या ठिकाणी सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. राष्ट्रीय किसान मजदूर संघाने उद्या मध्य प्रदेश बंदची हाक दिली आहे.
केंद्र सरकारचा सलग पाच वेळा कृषी कार्यासाठी पुरस्कार पटकावणार्‍या मध्य प्रदेशातील शेतकरीच आता रस्त्यावर उतरले आहेत. शेतकरी कर्जमाफीसोबत शेतकर्‍यांनी हमीभावाचीही मागणी केली आहे. दरम्यान शिवराज सिंह चौहान यांनी शेतकर्‍यांना आश्‍वासन दिलं आहे. मात्र तरीही शेतकर्‍यांचं आंदोलन अधिक तीव्र झालं आहे.