Breaking News

पंकजा मुंडेंच्या पारदर्शक कारभारामुळे राज्यातील 4 हजार शिक्षकांना दिलासा

बीड, दि. 17 - मागील सरकारच्या काळात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणा-या गुरूजनांचा आंतरजिल्हा बदलीमध्ये अक्षरश: छळ होत होता. बदलीसाठी लाखो रूपये  मोजावे लागत होते. याचा अतिशय वाईट अनुभव बीड जिल्ह्यासह राज्यभरातील हजारो शिक्षकांना आला होता. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणा-या गुरूजनांची ही  अडचण लक्षात आल्यानंतर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अतिशय पारदर्शकपणे शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची ऑनलाईन प्रक्रिया राबवली. पहिल्याच टप्प्यात  एक रूपयाचाही खर्च न येऊ देता चार हजाराहून अधिक शिक्षकांच्या नुकत्याच ऑनलाईन बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंडे यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या या  ऑनलाईन बदल्यांमुळे राज्यभरातील गुरूजनांना मोठा दिलासा मिळाला असून दलालांच्या तावडीतून त्यांची सुटका झाली आहे. 
दोन वर्षापुर्वी आघाडी सरकारच्या काळात बीड जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीचा मोठा घोटाळा उघडकीस आला होता. तत्कालीन काही पदाधिकारी, अधिकारी  आणि दलालांनी शिक्षकांकडून लाखो रूपये घेऊन त्यांच्या आंतरजिल्हा बदल्या केल्याचे प्रकारण पुढे आले होते. अडीच वर्षापुर्वी बीड जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या  बदल्यांमध्ये एका तत्कालिन पदाधिका-याने किती कोटी रूपयांचा घपळा केला याची आजही शिक्षक आणि जिल्हा परिषदेच्या वर्तुळात चवीने चर्चा केली जाते. केवळ  बीड जिल्हाच नव्हे तर राज्यभरात असे प्रकार घडत असल्याने शिक्षकांचा आंतरजिल्हा बदल्यांमध्ये अर्थिक आणि मानसिक छळ होत होता. लाखो रूपये देऊन आणि  कोणा कोणाचे किती वेळा उंबरठे झिजवून बदली होईलच की नाही, हे खात्रीने सांगता येत नव्हते. बदली झाली तर समायोजन होईल की नाही? पगार मिळेल की  नाही? अशा अनेक समस्यांना शिक्षकांना तोंड द्यावे लागत असे. दरम्यान राज्यात सत्ता परिवर्तन झाले आणि मुंडे यांनी आंतरजिल्हा बदली प्रकरणातील शिक्षकांची  पिळवणूक थांबवण्यासाठी सचिव असिम गुप्ता यांच्याशी चर्चा करून राज्यभरातील शिक्षकांच्या अतिशय पारदर्शकपणे ऑनलाईन बदल्या करण्याचा निर्णय घेतला.
राज्यभरात 21 हजार 800 शिक्षक बदल्यांच्या प्रतिक्षेत होते. बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या या शिक्षकांची पिळवणुक थांबवण्यासाठी अतिषय पारदर्शकपणे ऑनलाईन  आंतरजिल्हा बदली प्रक्रीया राबवून पहिल्या टप्प्यात 12 जुन 2017 रोजी 4 हजार 45 शिक्षकांची त्यांच्या मागणी आणि सोईनुसार बदली करण्यात आली. या  बदलीसाठी सबंधित चार हजाराहून अधिक शिक्षकांना साधा एक रूपयाचाही खर्च आला नाही. पहिल्या टप्प्यातील ऑनलाईन बदली प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे  पार पडली असून राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या पारदर्शक कारभारामुळे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणा-या गुरूजनांची अर्थिक आणि मानसिक  पिळवणूक करणा-या दलालांच्या तावडीतून कायमची सुटका झाली आहे. या पुढे आंतरजिल्हा बदलीसाठी आमच्या गुरूजन मंडळीला कुणाचे उंबरठे झिजवावे  लागणार नाहीत, ज्ञानदानाच्या पवित्र कार्यातून कष्टाने मिळालेला पैसा कोणा दलालाला द्यावा लागणार नाही, कोणापुढे आपला स्वाभिमान गहान ठेवून मान झुकवावी  लागणार नाही, असे मुंडे यांनी 4 हजार शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेनंतर म्हटले आहे.
मुंडे यांच्या कणखर आणि पारदर्शक कारभार करणा-या नेतृत्वामुळेच पारदर्शकपणे ऑनलाईन बदली प्रक्रिया पार पडल्याचे राज्यभरातील शिक्षकांनी म्हटले असून मुंडे  यांचे त्यांनी आभार मानले आहेत. अशा पध्दतीने शिक्षकांच्या पारदर्शक ऑनलाईन आंतरजिल्हा बदल्या करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य  असल्याचे बोलले जात आहे. याचे सारे श्रेय मुंडे यांना असल्याचे ऑनलाईन आंतरजिल्हा बदली झालेल्या चार हजार शिक्षकांनी म्हटले आहे.