Breaking News

दरवर्षी देशभरातील प्राणी संग्रहालयात 20 वाघांचा मृत्यू

नवी दिल्ली, दि. 12 - देशभरात दरवर्षी प्राणी संग्रहालयातील 20 वाघांचा मृत्यू होत असल्याचे असोसिएशन ऑफ इंडियन झू एण्ड वाईल्ड लाईफ व्हेटर्नरिअन्स’ने म्हटले आहे. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने केलेल्या पाहणीत हे समोर आले आहे. 2015-16 मध्ये देशात 245 वाघ व 99 पांढरे वाघ होते. त्याच वर्षी 16 पांढरे वाघ व 28 अन्य वाघांचा मृत्यू झाला.
मोठ्या, मध्यम व लहान आकाराचे मिळून सध्या वाघांसाठी 60 प्राणीसंग्रहालये आहेत. पांढरे बंगाली वाघ देशभरातील 27 प्राणीसंग्रहालयात विखुरलेले आहेत. साध्या वाघांमध्ये गेल्या चार वर्षांपासून सातत्याने घट होत आहे. 2011-12 मध्ये 295 चा आकडा 2015-16 मध्ये 245 वर आला आहे. गेल्या 16 वर्षांत 2015-16 मध्ये सर्वाधिक 16 पांढ-या वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. कैदेत असलेल्या वाघांचा मृत्यू होण्यामागील कारणे शोधली जात आहेत. या मोहिमेसाठी अनेक संस्थांचे आम्हाला सहकार्य हवे आहे. दरम्यानच्या काळात वाघांच्या मृत्यू दरात वाढ होण्यामागे कॅनिन डिस्टेंपर विषाणू कारणीभूत असावा, असे ॠअसोसिएशन ऑफ इंडियन झू एण्ड वाईल्ड लाईफ व्हेटर्नरिअन्स’चे अध्यक्ष बी.एम. अरोरा यांनी सांगितले.