Breaking News

भारताने आफ्रिकेला त्यांच्याच औषधाचा डोस पाजला!

लंडन, दि. 12 - विराट कोहलीच्या टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून, मोठ्या रुबाबात चॅम्पियन्स ट्रॉफीची उपांत्य फेरी गाठली. विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. मग भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचा अवघ्या 191 धावांत खुर्दा उडवला. त्यानंतर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहलीनं दुसर्‍या विकेटसाठी रचलेल्या 128 धावांच्या भागिदारीनं टीम इंडियाला विजयपथावर नेलं. भारताकडून शिखर धवननं 78 धावांची, तर विराट कोहलीनं नाबाद 76 धावांची खेळी उभारली.
त्याआधी भुवनेश्‍वर कुमार आणि जसप्रीत बुमरानं दक्षिण आफ्रिकेच्या प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. या विजयानं भारताचं उपांत्य फेरीचं तिकीट कन्फर्म केलं असून, 15 जूनला बर्मिंगहॅमच्या एजबस्टनवर होत असलेल्या उपांत्य सामन्यात  टीम इंडियाची गाठ बांगलादेशशी पडेल. त्याआधी, भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचा अख्खा डाव 191 धावांत गुंडाळून खरोखरच कमाल केली. क्निन्टॉन डी कॉक आणि हाशिम अमलानं 76 धावांची सलामी दिली खरी, पण त्यासाठी त्यांना 105 चेंडू खर्ची घालण्याची वेळ आली. कारण भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकी सलामीवीरांना मोठे फटके खेळण्याची संधीच दिली नाही.