Breaking News

आदिवासी शेतकर्‍याचे घर आगीत भस्मसात

अकोले, दि. 04 - अकोले तालुक्यातील रंधा धबधब्याजवळ भोईरवाडी या ठिकाणी रामा सखाराम पोरे या आदिवासी शेतकर्‍याच्या राहात्या घराला आग लागुन लाखों रुपयांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्थ कुटुंबियाना युवा नेते सतिष भांगरे यांनी भेट व आर्थिक व कपड्यांची मदत केली.
रविवारी रंधा धबधब्याच्या परिसरात पावसाने आकांडतांडव करुनही रामा सखाराम पोरे या शेतकर्‍याच्या राहत्या घराने संध्याकाळच्या वेळेस अचानक पेट घेतला. ज्यावेळी या घराला आग लागली तेव्हा या घरातील सदस्य हे शेतीची कामे करण्यासाठी शेतात गेलेली होती. या आगीच्या भक्ष्यस्थानी घरामधील 25 पोते भात, रोख 14 हजार रुपये, एक तोळा सोने, बँकेचे पासबुक, आधारकार्ड व इतर कागदपत्र तसेच घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य पडले. रामा हा वाडीपासून थोडा दूर राहत असल्यामुळे आग विझवण्यासाठी लवकर मदत मिळू शकली नाही. या आगीचा पंचनामा हा या परिसराचे महसूलचे मंडलाधिकारी लोहरे यांच्या निरीक्षणाखाली कामगार तलाठी धिंदळे व्ही. एम. व निकम भाऊसाहेब व गावकर्‍या समक्ष करण्यात आला असून एकूण सुमारे दोन लाखाचे आगीमुळे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
कुटुंबाला आधार देण्यासाठी युवा नेते सतिष भांगरे, आदिवासी ठाकर समाजाचे तालुका उपाध्यक्ष रामदास गावंडे, नामदेव भांगरे, सरपंच अंजना कोर्डे, उपसरपंच मधुकर पटेकर यांनी सबंधित कुटुंबाला भेट देवून आर्थिक मदत केली.
पंधरा दिवसांपूर्वीच भंडारदरा परिसरात आगीचे प्रकरण घडलेले असतानाच पुन्हा एकदा दुसरी आग लागल्याने या आगिविषयी संशय निर्माण झाले आहे. पावसाळ्याचे दिवस जवळ आल्याने भातासाठी राब तयार करुन रान भाजण्याच्या प्रक्रियेला आता वेगवान सुरूवात झाली आहे. तरी रान भाजताना शेतकर्‍यानी काळजी घ्यावी, असे आवाहन विजय भांगरे यांनी केले आहे. घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे. सबंधित घटनेचा पंचनामा केला असून पंचायत समितीच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकर्‍यास राहाण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल तसेच रेशनकार्ड, जातीचे दाखले आदी अतिशय महत्वाचे कागदपत्र जळुन खाक झाले. सर्व नवीन कागदपत्र नव्याने काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु असे अश्‍वासन यावेळी श्री भांगरे यांनी दिले. या पिडीत कुटुंबात कोडांबाई रामा पोरे, संपत, अक्षय, हिरामण रामा पोरे असा परिवार आहे.
दुसर्‍या एका ठिकाणी वाकी या गावामध्ये श्रावणा सखाराम भोईर (वय 40) या शेतकर्‍याच्या घरामध्ये बांधलेल्या बैलावर रविवारी साडेपाच झालेल्या पावसात वीज पडली. यात बैल हा मृत्युमुखी पडला असून यात श्रावणा भोईर याचे अंदाजे 48 हजारांचे नुकसान झाले आहे. या मयत झालेल्या बैलाचाही पंचनामा मंडलाधिकारी व कामगार तलाठी यांनीच केला असून लवकरात लवकर शासकीय निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे लोहरे या मंडलाधिकार्‍यांनी सांगितले.