Breaking News

शहरात बोकाळलेली अवैध वाहतूक रोखण्यासाठी अखेर पुणे आरटीओ मैदानात उतरणार

पुणे, दि. 24 - शहरात बोकाळलेली अवैध वाहतूक रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांची यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे पाहून पुणे आरटीओने (प्रादेशिक परिवहन  कार्यालय) अखेर स्वत:च मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या धडक कारवाईत पहिल्याच दिवशी 65 वाहनांवर खटले भरुन 44 वाहने जप्त करण्यात आली  आहेत. 
शहरांतर्गत प्रवासी वाहतुकीचे अधिकार पीएमपीएल व परवानाधारक ऑटो रिक्षाचालकांना आहेत. मात्र शहरालगतच्या काही ग्रामीण भागात खासगी ऑटो रिक्षा, मारुती  व्हॅन व परवाना नसलेल्या बसेस प्रवासी वाहतूक करतात. याबाबत वाहतूक पोलिसांकडून वारंवार फक्ता बघ्याची भूमिका घेतली जात आहे. यासंदर्भात आरटीओ  कार्यालास मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. यावर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून सोमवारी धडक तपासणी मोहीम आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये शहर व उपनगरातील अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांची तपासणी करण्यासाठी सात पथके तैनात करण्यात आली होती. प्रत्येक पथकात दोन मोटार  वाहन निरीक्षक व एक कार्यालयीन कर्मचारी नेमण्यात आला होता. ही कारवाई कोंढवा, वडगाव धायरी, हडपसर, भेकराईनगर, चंदननगर या भागात करण्यात आली.  यामध्ये 276 वाहनांची तपासणी करण्यात येऊन त्यातील 65 वाहनांवर खटले दाखल करण्यात आले. जप्त केलेली 45 वाहने आरटीओ कार्यालय, स्वागरेट,  हडपसर, कोथरुड, पीएमपीएल डेपो येथे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये खासगी ऑटो रिक्षा, टॅक्सीव, बसेस, मिनीडोअर, ऍपे रिक्षा इत्यादी वाहनांचा समावेश आहे.
वाहतूक पोलीस कधी कारवाई करणार?
शहरात परवानाधारकांपेक्षा अवैध वाहतूक करणार्‍या ऑटोरिक्षांची संख्या मोठी आहे. विशेषत: धायरी, वडगाव, कात्रज, हडपसर, खराडी, वाघोली हद्दीत अशा  ऑटोवाल्यांचा अक्षरश: ऊत आला आहे. चिरीमिरी घेवून अनेकदा या ऑटोचालकांना सोडून दिले जाते. काही ठिकाणी ‘अर्थङ्क पूर्ण संबंध असल्याने ऑटोचालक  वाहतूक पोलिसांनाही जुमानत नाहीत. त्यामुळे सामान्य पुणेकरांची कोंडी होत आहे. आता प्रत्यक्ष आरटीओ मैदानात उतरल्याने वाहतूक पोलीस कधी कारवाई  करणार, असा प्रश्‍नर पुणेकरांनी विचारला आहे.