Breaking News

बदलत्या परिस्थितीत कृषी विद्यापीठांनी शेतक-यांना आधार द्यावा - खोत

परभणी, दि. 28 - स्पर्धेच्या युगात शेती बदलत चालली आहे. बदलत्या काळात शेतक-यांना आधार देण्याची जबाबदारी कृषी विद्यापीठांची आहे. शेती हा देशाचा  आर्थिक कणा आहे. असे प्रतिपादन कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली.
परभणी येथील कै. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सभागृहात उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत संपर्क शास्त्रज्ञ प्रशिक्षण कार्यक्रमात श्री. खोत  बोलत होते. यावेळी कै. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी. व्यंकटेश्‍वरलु , शिक्षण संचालक अशोक धवन, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद  वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, कुलसचिव डॉ. विलास पाटील आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. खोत म्हणाले, शेती क्षेत्र टिकायचे असेल तर कृषी विद्यापीठाच्या मदतीचा आणि नियोजनाचा शेतक-यांना फायदा व्हायला हवा. बदलत्या काळात शेतकर्-यांना  आधार देण्याची जबाबदारी कृषी विद्यापीठांची आहे. उत्पादन वाढ करणारे, बदलत्या वातावरणात टिकणारे रोगमुक्त वाण कृषी विद्यापीठाने संशोधन करावे.  शेतक-यांच्या बांधावर जावून शेतकर्यांना नवीन संशोधनाची, पिकाची, वाणाची माहिती द्यावी. यावर्षी तुरीचे भरभरुन उत्पादन आले. परंतु साठवणुकीसाठी सुविधा  नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. गावागावात शेतमाल गोदामांचे जाळे निर्माण करावे.
कृषी क्षेत्रात अनेक शोध लागत आहेत. ग्लोबल वार्मिंग, पर्जन्यमानाची अनियमितता, हवामान चक्रात बदल होत आहे. या काळात शेतक-यांना उभे करावयाचे आहे.  तसेच शेती उत्पादन वाढीवर भर द्यावयाचा आहे. तसेच हवामान बदलात तग धरणारे व किड रोगास कमी बळी पडणारे, पिकाचे वाण निर्माण करावे लागतील.  तालुकास्तरावर प्रात्यक्षिके आयोजित करावेत. शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यात सतत संवाद झाला पाहिजे. या अभियानात कृषि विद्यापीठांतर्गत असलेली विविध  महाविद्यालये, कृषि विज्ञान केंद्रे व संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी यांचा सहभाग महत्वाचा असून विद्यापीठ शास्त्रज्ञांनी शेतक-यांच्या बांधावर जावून  मार्गदर्शन करावे, असेही श्री. खोत यांनी सांगितले. यावेळी विद्यापीठ शास्त्रज्ञ लिखित खरिपातील मुख्य पिकांचे एकात्मिक व्यवस्थापन या पुस्तिकेचे श्री. खोत यांच्या  हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रारंभी विद्यापीठाचे कुलगुरु श्री. व्यंकटेश्‍वरलु यांनी कृषी विद्यापीठाच्या प्रगतीची माहिती यावेळी दिली. प्रास्ताविकात डॉ. बी. बी. भोसले  यांनी या अभियानास कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे तांत्रिक पाठबळ असणार आहे, असे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. ए. के. भुत्ते यांनी केले.